ठाणे : तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडीत मोठी कारवाई केली असून गोळ्या बिस्किट विक्री करणाऱ्या दुकानदाराने प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. भिवंडी शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून भेसळखोर आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला गस्ती घालत असताना प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथक आणि शांतीनगर पोलिसांनी
भिवंडी येथील पिराणीपाडा परिसरात धाड टाकली. त्यावेळी एका गाळ्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. पथकाने गाळ्याच्या मालकाबाबत विचारणा केली असता, दुकानामध्ये गोळ्या बिस्किटांची विक्री करणारा एकजण पुढे आला. त्याने त्याचे नाव शाहिद मुस्ताक अहमद अन्सारी असल्याचे सांगितले. या कारवाईत पथकाने १ लाख ५९ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२), (१), २६ (२) (४), २७ (३), (ड), २७ (३) (ई), ३(१) (झेड-झेड)(४), ३० (२)(अ), ५९ आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम १२३, २२४, २७४ आणि २७५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
