ठाणे – दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार गुप्तवार्ता दक्षता विभाग आणि कोकण विभागाने संयुक्तपणे राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत भिवंडीसह कोकण विभागातील विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल १२ कोटी ४२ लाख ८७ हजार १५३ रुपये किमतीचा संशयास्पद, निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल, आयात केलेली चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, एनर्जी ड्रिंक्स तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थांचा समावेश आहे.

भिवंडी येथील डीमार्ट (ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड) येथे २९ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत १ लाख ३१ हजार २११ किलो वजनाचे, सुमारे ४ कोटी ६ लाख ६४ हजार ४८४ रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. या खाद्यतेलाच्या लेबलमध्ये त्रुटी आढळून आल्याने तसेच त्याच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी भिवंडीतील अंबीया ट्रेडर्स येथेही छापा टाकण्यात आला होता. या ठिकाणी जुन्या डब्यांचा वापर करून अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे पॅकिंग केले जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ९८३ किलो वजनाचा १ लाख ८२ हजार ६७८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनेचा अन्न परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

कोकण विभागातील अन्य ठिकाणीही प्रशासनाने मोठी कारवाई केली. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ‘अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी’ या आस्थापनेवर २४ ऑक्टोबर रोजी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर आयात केलेली चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्स जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये आहे. त्याच दिवशी नवी मुंबईतील तुर्भे येथील ‘सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि.’ येथेही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ९१ हजार ३५३ किलो वजनाचा, ४ कोटी १३ लाख ३३ हजार ३० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये जर्दाळू, अंजीर, बेदाणे, काळी मिरी आणि खजूर यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी लेबलमधील त्रुटींसह तब्बल २६ प्रकारचे १ कोटी ६२ लाख ९८ हजार ६८० रुपये किमतीचे मुदतबाह्य अन्नपदार्थही आढळून आले.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.