ठाणे : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात धडक कारवाई केली आहे. २ ऑक्टोबर रोजी ठाणे विभागातील दोन आणि पालघर विभागातील एका ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांसह वाहने असा एकूण २ कोटी ६९ लाख २९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठाणे विभागातील झोन १० अंतर्गत येवई पूल परिसरात प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने संबंधित वाहनावर छापा टाकून तपासणी केली. या वाहनामध्ये ‘प्रीमियम राज निवास’ पान मसाल्याची २७ हजार ५४० पाकिटे आणि ‘झेडएन-०१ जाफरानी जर्दा’ची २७ हजार ५४० पाकिटे आढळून आली. या प्रतिबंधित पदार्थांची एकूण किंमत ८१ लाख ५१ हजार ८४० रुपये असून, सुमारे २० लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एकूण १ कोटी १ लाख ५१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर विभागातील झोन एक अंतर्गत चारोटी टोलनाका येथेही २ आणि ३ ऑक्टोबर रोजी प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक व विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४३ लाख ५० हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणात वाहनचालक फिरोज खाजा मिया सय्यद याच्यासह आणखी सहा जणांचा सहभाग आढळून आला. या कारवाईत एकूण ६३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्रीमागे संघटित स्वरूपाचे जाळे आहे का, याचा तपास करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू होतो किंवा नाही, याबाबत तपास करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठाणे विभागात करण्यात आलेल्या कारवाईतही प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत ८४ लाख २८ हजार २० रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. त्यामुळे या कारवाईतील एकूण जप्तीची किंमत १ कोटी ४ लाख २८ हजार २० रुपये इतकी आहे. या प्रकरणी विनय शर्मा याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद रफिक रती खान (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील यापूर्वीच्या कारवाईसह जप्तीची एकूण किंमत १ कोटी १४ लाख १३ हजार ५८० रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतूक, साठवणूक व विक्रीमागील संघटित स्वरूपाचा तपास करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू होतो किंवा नाही, याचाही तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाया संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. कारवाईदरम्यान गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनीही सहकार्य केले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील या तीन कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि वाहने मिळून एकूण २ कोटी ६९ लाख २९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम सुरू असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढेही विशेष मोहिमा राबवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.