अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर ३२४ नमुने तपासणीसाठी ताब्यात

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी १० पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत मिठाईचे ३२४ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे. मिठाईच्या दुकानांतील स्वच्छतेसंदर्भात गेल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे मोठय़ा दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात मिठाईची विक्री होते. त्यात काही वेळा निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. बाहेरगावाहून येणाऱ्या माव्यामुळे विषबाधेचे प्रकार घडतात. त्यामुळे यंदा माव्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाची करडी नजर आहे.

मिठाईच्या व्यवसायात असणाऱ्यांसाठी प्रशासनाने एक छोटी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात मिठाई व्यावसायिकांनी कोणती काळजी घ्यावी, याचे सविस्तर विवेचन आहे. मात्र बहुतेक मिठाई विक्रेते ही पुस्तिका वाचत नाहीत. त्यामुळे आता व्यावसायिकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रशिक्षण असल्याशिवाय व्यवसायाचा परवाना न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच परवान्याचे नूतनीकरण करतानाही संबंधित व्यावसायिकांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील मिठाईची दुकाने तपासण्यासाठी प्रशासनाने एकूण १० पथके नेमली आहेत. एका पथकात प्रत्येकी तीन ते चार जण आहेत. प्रत्येक पथकात एक साहाय्यक आयुक्त आणि इतर अन्न निरीक्षक आहेत. २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या ४० दिवसांत कोकण विभागात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून प्रशासनाने तब्बल ९ लाख २० हजार ७४४ रुपयांचा निकृष्ट दर्जाचा माल जप्त केला. त्यात खाद्यतेल, स्पेशल बर्फी, तूप, मावा, रवा, बेसन आदींचा समावेश होता.

– सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन