बसथांब्यांभोवती मार्गरोधकाचे आवरण; प्रवाशांची नाराजी

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे बसथांब्यांभोवती मार्गरोधकांचे आवरण उभारण्यात आल्याने प्रवाशांना बसची वाट पाहात रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील भरधाव वाहनांची धडक प्रवाशांना बसून जीवघेणा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, माजीवडा, नितीन कंपनी, मानपाडा, वाघबीळ या भागात हे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

करोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. तर खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला अद्याप रेल्वेमध्ये प्रवेश बंदी आहे. त्यामुळे अनेकांना परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र मेट्रोच्या कामांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसची वाट पहात रस्त्यावर उभे रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्गरोधक उभारून शहरातील महत्त्वाचे रस्ते अर्धे व्यापले आहेत. हे रस्ते अरुंद झाल्याने त्याचा वाहतुकीवरही परिणाम होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बसथांब्याभोवती मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे ठाण्यातील काही बस थांबे टीएमटी आणि बेस्टने काही अंतर पुढे नेले आहेत. तर काही बस थांबे अद्यापही आहेत, त्याचजागी आहेत. असे असले तरी या बसथांब्यांची जागा मात्र अद्याप बदलण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्गरोधकाच्या पुढे असलेल्या रस्त्यावर प्रवाशांना बसची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. या बसथांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. परंतु या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. काही वेळेस बस थांब्यावरील प्रवाशांना बसगाडी आल्याचेही दिसत नाही. अनेकदा भरधाव वाहने प्रवाशांच्या बाजूने निघून जातात. एखाद्या भरधाव वाहनाचा प्रवाशांना धक्का लागून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजीवडा, मानपाडा, कासारवडवली या परिसरातील बसथांब्यांवर हे चित्र दिसून येते.

ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्याठिकाणी सध्यातरी काही उपाययोजना करता येत नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण झाल्यानंतर तेथील बस थांबे दुरुस्त करणार आहोत.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका