परतीच्या पावसामुळे खड्डे पुन्हा उखडण्याची भीती

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डेभरणीची कामे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी हाती घेतली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दररोज सायंकाळच्या वेळेत परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडण्याची भीती असल्याने पालिकेने खड्डे भरणीची कामे थांबविली आहेत. पाऊस थांबताच डांबराच्या साहाय्याने खड्डेभरणीची कामे पुन्हा हाती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे परतीचा पाऊस थांबेपर्यंत ठाणेकरांना खड्डे भरणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. काही रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहरातील अंतर्गत उड्डाणपुलांवरही खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून यातूनच काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांद्वारे पालिका प्रशासनावर टीका करण्यात आली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा करून खड्डेभरणीची कामे करण्याचे आदेश दिले होते. पाऊस थांबताच शहरातील रस्त्यांवरील खड्डे           डांबराच्या साहाय्याने बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले होते. ही मोहीम सुरू होऊन दोन दिवस उलटत नाहीत, तोच शहरात परतीचा पाऊस सुरू झाला. गेल्या आठ दिवसांपासून दररोज सायंकाळच्या वेळेत परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे डांबराने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडण्याची भीती असूून त्याचबरोबर निधीही वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने खड्डेभरणीची कामे गेल्या  काही दिवसांपासून थांबविली आहेत. काही ठिकाणी मोठे  खड्डे असतील तर, ते खडी आणि मातीच्या साहाय्याने बुजविले जात आहेत. तर पाऊस थांबताच डांबराच्या साहाय्याने खड्डेभरणीची कामे पुन्हा हाती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सायंकाळी परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे डांबराच्या साहाय्याने खड्डे बुजविणे शक्य नाही. त्यामुळे खडी आणि मातीच्या साहाय्याने खड्डे बुजविले जात आहेत. खड्डेभरणीच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी पाऊस थांबल्यानंतर ही कामे हाती घेतली जाणार असून त्यावेळेस डांबराच्या साहाय्याने खड्डे भरणीची कामे केली जाणार आहेत.  – अर्जुन अहिरे, नगर अभियंता, ठाणे महापालिका