ठाणे : ठाणे, घोडबंदर, भिवंडी भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कापुरबावडी-माजिवाडा उड्डाण पुलांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्लास्टिकच्या वाहिन्या बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी त्या तुटलेल्या असल्यामुळे त्यातून खालच्या रस्त्यावर धबधब्या सारखे पाणी कोसळत असून या धबधब्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे, घोडबंदर, भिवंडी या सर्वच परिसरांचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच येथे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर, घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा मार्ग जातो. याशिवाय, कापुरबावडी येथून भिवंडी शहराच्या दिशेने एक मार्ग जातो.
या मार्गावर शहरातील नागरिकांच्या वाहनांची सतत वर्दळ असते. याशिवाय, उरण येथील जेएनपीटी बंदर ते गुजरात अशी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वाहतूक असते. ही वाहतूक रात्री आणि दुपारच्या वेळेत होते. या अवजड वाहतूकीमुळे शहरात कोंडी होऊ नये यासाठी घोडबंदर मार्गासह कापुरबावडी-माजिवाडा भागात काही वर्षांपुर्वी उड्डाण पुल उभारण्यात आलेला आहे. हा पुल ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी या तिन्ही शहरांच्या मार्गिकेला जोडण्यात आलेले आहेत. तर, या पुलाखालून शहरातील नागरिकांच्या वाहनांची वाहतूक सुरू असते.
कापुरबावडी आणि माजिवाडा या दोन्ही जंक्शनवर असलेल्या उड्डाण पुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्लास्टिक वाहिन्या बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या वाहिन्या तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे पाऊस सुरू असताना, उड्डाण पुलावरील तुटलेल्या वाहिन्यांमधून रस्त्यावर धबधब्या सारखे पाणी कोसळते. गढूळ पाणी अनेक दुचाकी स्वारांच्या अंगावर पडते. काही वेळेस या पाण्यामुळे पुढेचे दृश्य चारचाकी चालकांना दिसत नाही. यामुळे वाहन धडकून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी हेच चित्र होते. यंदाही हे चित्र कायम असून त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. घाण पाणी अंगावर पडत असल्याने दुचाकीस्वारांमधून संताप व्यक्त होत आहे.