कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरील स्कायवाॅकवर असलेल्या रेल्वे तिकीट खिडकीजवळ सोमवारी एक महिला रेल्वे प्रवासी तिकीट काढत होती. रेल्वे तिकीट कारकून महिला सुट्टे पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळणार नाही म्हणून अडून बसली होती. सुट्टे पैसे जवळ नसल्याने तिकीट द्यावे, अशी विनंती प्रवासी महिला करत होती. पण रेल्वे महिला कारकुनाने महिला प्रवाशाला स्वताच्या दालनात बोलावून घेऊन तिच्याशी वाद घालून तिला बेदम मारहाण केली.

दोन महिलांमध्ये मारहाण सुरू झाल्याने मध्ये कसे पडायचे असा प्रश्न पुरूष प्रवाशांमध्ये निर्माण झाला. काही पुरूष प्रवाशांनी धाडस करून दोन्ही महिलांना बाजुला केले. त्यानंतर तेथे गस्ती पथकावरील रेल्वे पोलीस आले. त्यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.रेल्वे महिला तिकीट कारकुनाने प्रवासी महिलेला केलेल्या मारहाणीची दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

हेही वाचा >>>ठाणे : मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांकडून मारहाण

सोमवारी सकाळी एक प्रवासी महिला फलाट क्रमांक सातवरील स्कायवाॅकवर तिकीट खिडकीवर तिकीट काढत होती. जवळ सुट्टे पैसे नसल्याने तिने आहे त्या पैशांमधून तिकीट देण्याची मागणी केली. रेल्वे महिला तिकीट कारकुनाने सुट्टे पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. लोकल पकडण्याची घाई असल्याने महिला प्रवाशाने विनंती केली, पण तिकीट कारकुन ऐकण्यास तयार नव्हती. पैसे देऊन, विनंती करून महिला कारकुन ऐकत नसल्याने संतप्त झालेल्या प्रवासी महिलेने रेल्वे कारकुन महिलेची दृश्यचित्रफित काढून ती रेल्वेच्या वरिष्ठांना पाठविण्याची तयारी केली.

ही दृश्यचित्रफित काढू नये म्हणून महिला कारकुन प्रवासी महिलेला आतून रोखू लागली. आपली दृश्यचित्रफित प्रवासी महिला काढते त्याचा रेल्वे महिला कर्मचाऱ्याला राग आला. तिने प्रवासी महिलेला आपल्या तिकीट दालनात बोलावून घेतले. तिला तेथे बेदम मारहाण केली. इतर प्रवासी मध्ये पडल्याने हा वाद काही वेळाने मिटला.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून गुंतवणूकदारांची ७३ लाखाची फसवणूक

या मारहाणीनंतर प्रवासी महिला आणखी संतप्त झाली. तिने तेथे रेल्वे महिला तिकीट कारकुनावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करून तेथेच ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तेथेच शांत केले. त्यानंतर प्रवासी महिला तेथून तिकीट घेऊन निघून गेली. या प्रकाराने प्रवासी महिलेला मोठा धक्का बसला आहे.

रेल्वे तिकीट खिडकीवरील बहुतांशी महिला तिकीट कारकुन या तिकीट काढताना सुट्टे पैसे नसतील तर प्रवाशांची खूप अडवणूक करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे महिला कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.