ठाणे : ठाणे महापालिका शाळांना नव्या भरती प्रक्रीयेतून १८१ शिक्षक उपलब्ध झाल्याने शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर होताना दिसत असतानाच, या शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुढे आली आहे. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १३४ शाळा असून यापैकी ५७ शाळा मुख्याध्यापकाविनाच सुरू असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पालिकेने या शाळा सुरू केल्या. पालिकेच्या प्राथमिक १११ तर, माध्यमिक २३ अशा एकूण १३४ शाळा आहेत. या शाळा मराठी, हिंदी आणि उर्दु माध्यमाच्या आहेत. या शाळेत सद्यस्थितीत ३५ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ९०० शिक्षकांची पदे मंजुर आहेत. परंतु गेल्या काही वर्षात शिक्षक निवृत्तीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या शाळांमध्ये सद्यस्थितीत ६७० शिक्षक उपलब्ध आहेत. २३० हून अधिक शिक्षकांची कमतरता असल्याने एका शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी होती. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत होती. दरम्यान, पवित्र पोर्टलवरुन ठाणे महापालिकेला १८१ शिक्षक उपलब्ध झाले आहे. उर्वरित ५० शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रीया सुरू केली आहे. असे असतानाच, १३४ पैकी ५७ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुढे आली आहे.

हे ही वाचा… संपूर्ण राज्यच माझे कुटुंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे महापालिकेच्या १३४ शाळेपैकी ५७ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यात मराठी माध्यमाच्या ४३, उर्दु माध्यमाच्या १० आणि हिंदी माध्यमाच्या ४ शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील अनेक शिक्षक मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु त्यांना पदोन्नती मिळाली नसल्यामुळे ही पदे रिक्त असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

हे ही वाचा… “विधानसभेला किसन कथोरेंचे काम करणार”, माजी मंत्री कपिल पाटलांचा नरमाईचा सूर; “मागे कुणी काय केले ते गौण…”

ठाणे महापालिका शाळेला पवित्र पोर्टलद्वारे १८१ शिक्षक उपलब्ध झालेले आहेत. तसेच ५४ शिक्षकांना मुख्यध्यापक पदोन्नती देण्यासंबंधीचा तयार करण्यात आलेला असून तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रीयेत आहे. त्यामुळे या शाळांना लवकरच मुख्याध्यापक मिळतील. – सचिन पवार, उपायुक्त, शिक्षण विभाग, ठाणे महापालिका