रेल्वे फाटक उघडण्यासाठी भिवंडी जवळील ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ | fight among railway employee and people at Juchandra railway crossing on opening gate issue | Loksatta

रेल्वे फाटक उघडण्यासाठी भिवंडी जवळील ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ

एक अनोळखी महिला व एक पुरुष अशा सात जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Juchandra , railway crossing, gate , railway employee, people
रेल्वे फाटक उघडण्यासाठी भिवंडी जवळील ज्युचंद्र रेल्वे फाटकात प्रवाशांचा गोंधळ ( Image Source – Wikipedia )

रेल्वे मार्गात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आली आहेत, हे माहिती असुनही भिवंडी जवळील ज्युचंद्र ते चंद्रापाडा गाव रस्त्या दरम्यानच्या रेल्वे फाटकात गुरुवारी रात्री दीड वाजता सात प्रवाशांनी फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला. रेल्वे फाटक नियंत्रकाला शिवीगाळ केली.

रेल्वे फाटक नियंत्रक गुंजन सिंह यांच्या तक्रारीवरुन सात जणांच्या विरुध्द डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित विश्वकर्मा (३४, पालघर) साजन सिंग (२८, नायगाव), गौरव सिंग (१९, नायगाव, पालघर), संतोष यादव (२७, रा. पठाणवाडी, मल्हाड, मुंबई), विल्सन डिसोजा (२७, रा. नायगाव), एक अनोळखी महिला व एक पुरुष अशा सात जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा… भिवंडी : खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात, दोनजण जखमी

पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री एक वाजल्यापासून ज्युचंद्र ते चंद्रापाडा रेल्वे मार्गा दरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम रेल्वे तांत्रिक विभागाने हाती घेतले होते. रेल्वेचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी राज कुमार, कुणाल कुमार, नीलेश साळुंखे, दत्ता पाटील असे अनेक कर्मचारी तेथे तैनात होते. दुरुस्ती कामामुळे ज्युचंद्र येथील रेल्वे फाटक बंद होते. भिवंडी दिशेकडे एक मालगाडी दिवा स्थानकाकडे येण्यासाठी मार्गस्थ होती. या कालावधीत दीड वाजता ह्ंदाई कारमधून सहा जण रेल्वे फाटका जवळ आले. त्यानंतर एक दुचाकी स्वार आला. ते रेल्वे फाटक उघडण्यासाठी मोठ्याने आपल्या वाहनांचे भोंगे वाजवून फाटक उघडण्यासाठी रेल्वे फाटक नियंत्रकाला सांगू लागले. दुरुस्तीचे काम सुरू आहे. भिवंडी जवळ एक मालगाडी उभी आहे. त्यामुळे फाटक उघडता येणार नाही असे नियंत्रक गुंजन सिंग यांनी सांगताच, मोटार, दुचाकीवरील वाहन चालक, प्रवासी रेल्वे मार्गात येऊन गोंधळ घालू लागले. सिंगला शिवीगाळ करू लागले. फाटक उघडा असा त्यांचा आग्रह होता. रेल्वे सुरक्षा जवान उमेश कुमार प्रवाशांची समजूत घालत होते. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

हेही वाचा… ठाणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

प्रवासी आक्रमक झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने वालीव पोलिसांना पाचरण करण्यात आले. मालगाडी कामण स्थानकातून कोपर दिशेने निघाली असताना प्रवाशांचा फाटक उघडण्याचा गोंधळ सुरू होता. अखेर फाटक नियंत्रक सिंग यांनी आपत्कालीन परिस्थितीचा दर्शक देऊन मालगाडी थोपवून धरली. या गोंधळात चार वाजले. प्रवाशांच्या गोंधळामुळे मालगाडी दोन तास उशिरा रवाना झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल सात जणांच्या विरुध्द लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:20 IST
Next Story
भिवंडी : खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात, दोनजण जखमी