ठाणे : ठाण्यासह कोकणपट्ट्यात विरोधकांची फारशी ताकद राहिलेली नाही. यामुळे आपली लढाई विरोधकांबरोबर नाहीतर प्रतिस्पर्धी मित्रपक्षांबरोबरच असल्याचा सूर ठाण्यात शुक्रवारी पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी लावल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाणे येथील वर्तकनगर भागातील भाजपच्या विभागीय कार्यालयात शुक्रवारी ‘संकल्प से सिद्धी तक’ ही कार्यशाळा पार पडली. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि नितेश राणे यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यशाळेत ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आजी-माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, आजी-माजी आमदार आणि खासदार हे उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात कोणती कामे केली, याची माहिती देत ती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्व प्राप्त झाल्या या बैठकीत नेत्यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा सूर लावला.
ठाण्यासह कोकण पट्ट्यात भाजपचे दिड कोटी सदस्य आहेत. या सर्वच ठिकाणी भाजप हाच मोठा भाऊ आहे. ठाण्यासह कोकण पट्ट्यात विरोधी पक्षांची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे आपली लढाई ही विरोधकांबरोबर नाही. आपली लढाई ही प्रतिस्पर्धी असलेल्या मित्र पक्षांबरोबरच आहे, असा सूर भाजपच्या नेत्यांनी कार्यशाळेत बोलताना लगावल्याचे सुत्रांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असून याठिकाणी आपल्या पक्षाला चांगले यश मिळू शकते. यामुळे त्या दृष्टीने कामाला लागा, अशा सुचना नेत्यांनी केल्या. भाजप हा जुळा भाऊ नाही तर, मोठा भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. कारण काही पक्ष भाजपाबरोबर तुल्यबळ होण्यासाठी पक्ष प्रवेश करून घेत असल्याचे नेते म्हणाले, अशी माहिती सुत्रांनी दिली.
कोकण पट्ट्यात नवीन जिल्हा आणि मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात कोणती कामे केली, याची माहिती देत ती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘संकल्प से सिद्धी तक’ ही कार्यशाळा घेण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कामाला लागले आहेत. तसेच स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी वैयक्तीक मताला पक्षात विचारात घेतले जात नाही. निवडणुकीसंदर्भातील निर्णय हा पक्षाचा निवडणुक संसदीय मंडळ घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अनुभवी नेते असून ते एकत्र बसून निर्णय घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस जो मार्ग दाखवतील, त्या मार्गाने आम्ही जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.