कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला गती; रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अंतिम मंजुरी | Final approval for project land acquisition from Ministry of Kalyan Murbad Railways amy 95 | Loksatta

कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला गती; रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अंतिम मंजुरी

बहुप्रतिक्षित कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच या कामासाठी भूसंपादन केले जाणार आहे.

Union Minister of State Kapil Patil
केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

बदलापूरः बहुप्रतिक्षित कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच या कामासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पाची ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर या मार्गाच्या उभारणीसाठी निविदा काढली जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण मुरबाड रेल्वेची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे.

हेही वाचा >>>माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षित असलेली कल्याण मुरबाड रेल्वेच्या कामात गेल्या काही महिन्यात कमालीची प्रगती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. जुलै महिन्यात राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आपला वाटा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारनेही तातडीने रेल्वे प्रशासनाला याबाबतचे हमीपत्र दिले. त्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या मार्गाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. आता यात आणखी एक टप्पा मार्गी लागत आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या रेल्वे प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणेपर्यंत दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:13 IST
Next Story
माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर