लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याणमध्ये एका खासगी ठेकेदाराने एका खासगी वित्त संस्थेत बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या आहेत असे सांगून गहाण ठेवल्या. या सोन्याच्या बांगड्यांच्या माध्यमातून चार लाख २५ हजार रूपये खासगी वित्त संस्थेतून कर्ज घेतले. गहाण ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या बनावट असल्याचे लक्षात आल्यावर खासगी वित्त संस्थेच्या अधिकाऱ्याने ठेकेदारावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खासगी वित्त संस्थेची फसवणूक करणारे खासगी ठेकेदार हे कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील योगीधाम रिक्षा स्थानक परिसरातील किंगस्टोन इमारतीत राहतात. खासगी वित्त संस्थेतील अधिकारी हे अंबरनाथ भागातील ग्रीन सिटी भागात राहतात.
दोन महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात चार दिवसाच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. कंत्राटदाराने आपल्या खासगी वित्त संस्थेत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या बनावट असल्याचे निदर्शनास आल्यावर वित्त संस्थेने आपल्या संस्थेची फसवणूक करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महात्मा फुले पोलीस ठाण्यात शुक्रवारी वित्त संस्थेच्या पुढाकाराने तक्रार करण्यात आली.
खासगी वित्त संस्थेच्या अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की आमच्या बँकेत एका खासगी कंत्राटदाराने चार सोन्याच्या बांगड्या खऱ्या आहेत असे भासवून तारण ठेवल्या होत्या. या माध्यमातून ठेकेदाराने काही उलाढाल केली होती. आपण बँकेत ठेवलेल्या बांगड्या या खोट्या आहेत हे माहिती असुनही कंत्राटदाराने त्या खऱ्या आहेत असे वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांना भासवले. याच सोन्याच्या बांगड्या घेऊन त्या आधारे अन्य एका खासगी वित्तीय संस्थेत त्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवायच्या आहेत असे सांगून त्या वित्त संस्थेत खऱ्या आहेत दाखवून गहाण ठेवल्या. या बनावट सोन्याच्या बांगड्यांच्या माध्यमातून चार लाख २५ हजार ४२० रूपये कंंत्राटदाराने खासगी वित्त संस्थेतून मंजूर करून घेऊन ते आपल्या युको बँकेतील व्यक्तिगत खाते क्रमांकावर वळते करून घेतले.
खासगी वित्त संस्थेने कंत्राटदाराने आपल्या बँकेत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्यांची पडताळणी केली तेव्हा त्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपण गहाण ठेवत असलेल्या सोन्याच्या बांगड्या या खोट्या आहेत हे माहिती असुनही ठेकेदाराने त्या हेतुपुरस्सर खासगी वित्त संस्थेत गहाण ठेऊन खासगी वित्त संस्थेची फसवणूक केली म्हणून वित्त संस्थेच्या अधिकाऱ्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरुध्द तक्रार केली. याप्रकरणी वित्त संस्थेने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. वरिष्ठांची मंजुरी मिळाल्यानंतर या तक्रार अर्जाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.