लोकोपयोगी कामांसाठीची कोटय़वधींची तरदूत अन्यत्र वळवली
पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून विविध विकासकामांसाठी पालिका प्रशासनाने भरीव तरतूद केली. मात्र रु ग्णालय, शवविच्छेदन केंद्र, रात्र निवारा शेड, दफनभूमी, वाचनालय, दिवाबत्ती, सामाजिक उपक्रम आदी अनेक कामांसाठी तरदूत केलेली रक्कम त्या कामांसाठी खर्चच झाली नसून अन्य कामांसाठी ती वळविण्यात आल्याचे उघड झाले आहे.
शिवसेनेचे पालिकेतील गटनेते आणि उपजिल्हाध्यक्ष धनंजय गावडे यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालिकेने रुग्णालय सुरक्षा व्यवस्था या योजनेखालीे १ कोटी २५ लाख रुपयांची तरदूत गेल्या आर्थिक वर्षांत केली होती, तर विकासनिधी योजनेंतर्गत रुग्णालय इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरदूत केली होती. मात्र त्यासाठी एकही रुपया खर्च न करता अनुक्रमे ६४ लाख आणि चार कोटी रुपये इतर योजनांसाठी वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन, शवागृह यासाठी एक कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली होती. परंतु ऑक्टोबर २०१५ पर्यंत एक रुपयाही खर्च न करता यासाठी राखीव केलेली रक्कम अन्य कामासाठी वळविण्यात आली. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नेमणे, ऐतिहासिक वास्तूंचे मूल्यवर्धन करणे या कामांसाठी तीन कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली होती. परंतु त्यातील २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अन्य कामांसाठी वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

*विकासनिधी अंतर्गत सर्वधर्मीयांच्या नवीन दहन आणि दफनभूमीसाठी ३० कोटी रुपयांची तरदूत होती. त्यातील १० कोटी अन्य कामासाठी वळविण्यात आले.
*पल्स पोलिओ लसीकरण व कर्मचारी भत्ता यांच्यावर अनुक्रमे १० लाख आणि १२ लाख रुपये रकमेची तरदूत केली होती. त्यातील २० लाख रुपये अन्य कामासाठी वळविले.
* रात्र निवारा शेड या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातीेल ९० लाखांची रक्कम इतर प्रयोजनासाठी वळविण्यात आली.
* वाचनालय, दिवाबत्ती, संरक्षण व्यवस्था इतर लोकोपयोगी उपक्रम आदींसाठी लाखो रुपयांच्या तरतुदी के ल्या होत्या. परंतु या सर्व रकमा त्या संबंधित विभागातील कामासाठी वापरण्यात आल्या नाही.

तरदूत केलेल्या निधीमधून बचत करून उरलेला निधी अन्य ठिकाणी वळवला जातो, परंतु वसई-विरार महापालिकेने हा निधी न वापरताच वळवला आहे. हा केवळ अर्थसंकल्पीय नियमाचा भंग नसून पालिकेचा आर्थिक बेशिस्तपणा दर्शवणारा आहे. पालिकेच्या या अनास्थेमुळे रुग्णालय, दफनभूमी आदींसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये गैरसोय होत आहे. पालिकेचा संवेदनशीलपणा हरवला असून लोकोपयोगी कामाबाबत ते किती सजग आहेत हे दिसून येत आहे.
– धनंजय गावडे, शिवसेना गटनेते