पालिका तिजोरीत केवळ १६ कोटी शिल्लक; ठेकेदारांची देयके थांबविण्याची प्रशासनावर नामुष्की

ठाणे : करोना संकटाच्या काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून पालिकेला आर्थिक दिलासा मिळत असला तरी या दोन्ही करांच्या वसुलीत गेल्या काही दिवसांत फारशी वाढ झालेली नाही. त्यातच खर्चाचा भार वाढल्याने पालिकेचे आर्थिक गणित कोलमडले असून करोना काळातही तिजोरीत ७० ते ८० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक ठेवणाऱ्या पालिकेकडे जेमतेम १६ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने आता ठेकेदारांची देयके देणे थांबविले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंत पालिकेला यश आले होते. पण इतर विभागांच्या कराची अपेक्षित वसुली झाली नसल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदाही अशीच काहीशी परिस्थिती आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा वस्तू आणि सेवा करातून ७६ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या रकमेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगार दिले जातात. या पगारावर सुमारे ७५ कोटी रुपयांच्या आसपास पैसे खर्च होतात. त्यातच रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये पालिकेला खर्च करावे लागत आहेत. या सर्वाचे नियोजन करून पालिका तिजोरीत ७० ते ८० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक ठेवत होती. परंतु गेल्या काही दिवसांत मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीत फारशी वाढ झालेली नाही. सवलत योजना बंद झाल्याने करभारणा प्रमाण कमी झाले आहे. त्यातच करोना उपाययोजना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगार आणि डायघर वीज प्रकल्प यामुळे पालिकेवर १७ कोटींचा बोजा पडला आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले असून पालिका तिजोरीत जेमतेम १६ कोटी रुपये शिल्लक आहेत.

महापालिकेमार्फत विविध प्रकल्प तसेच विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची देयके पैसे नसल्यामुळे पालिकेने थकविली होती. सुमारे ८०० कोटींची देयके थकविण्यात आल्याचे समोर आले होते. देयके देण्याच्या मागणीसाठी ठेकेदारांनी आंदोलनही केले होते. दरम्यान मालमत्ता कर तसेच पाणी देयकांची उत्पन्न वसुली चांगली होताच गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांची देयके देण्यास सुरुवात केली होती. परंतु आता तिजोरीत जेमतेम १६ कोटी शिल्लक राहिल्यामुळे पालिकेने ठेकेदारांची देयके देणे थांबिवले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘एमएमआरडीए’ कर्जाचा हप्ता वेळेवर

ठाणे महापालिकेने काही प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून काही वर्षांपूर्वी ३०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी पालिकेला दरवर्षी ३६ कोटी रुपयांचा हप्ता भरावा लागतो. या कर्जाची सुमारे १६४ कोटी रुपयांची रक्कम देणे बाकी आहे. सप्टेंबर महिन्यात म्हणजेच या महिन्यात या कर्जाचा ३६ कोटी रुपयांचा हप्ता पालिकेला भरावा लागणार आहे. पालिकेच्या तिजोरीत १६ कोटी रुपये शिल्लक असले तरी, पालिकेने या कर्जाच्या हप्त्याची रक्कम यापूर्वीच बाजूला काढून ठेवली आहे. त्यामुळे हा हप्ता वेळेत देणे पालिकेला शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.