ठाणे – ठाणे शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका इमारतीत मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. १८ मजली इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्यामुळे गृह संकुलात भितीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे इमारतीत आणि इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाल्याचे चित्र होते. या घटनेत दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे.
ठाणे शहरातील शास्त्रीनगर भागात मिलन हिल ही १८ मजली इमारत आहे. या इमारतीत ६० ते ७० रहिवाशी राहतात. या इमारतीमधील १० व्या मजल्यावर मंगळवारी पहाटे ४.१४ वाजताच्या सुमारास अचानक इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १० ते १३ मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्ट तसेच १० व्या मजल्यावरील दोन सदनिकांचे दरवाजे जळून नुकसान झाले. ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीच्या धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी, उपस्थानक अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, महावितरण कर्मचारी, महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी दाखल झाले.
आग लागल्यानंतर इमारतीत धूर पसरल्याने इमारतीमध्ये अंदाजे ६० ते ७० रहिवाशी अडकले होते. तसेच १० व्या मजल्यावरील रूम नंबर १००५ मध्ये चार आणि रूम नंबर १००६ मध्ये तीन रहिवाशी अडकले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढले. या घटनेत दोन व्यक्तींना भाजले आहे. यामध्ये रुचिरा देशमुख( ७४) यांच्या दोन्ही हाताला भाजले आहे. तर, विवेक प्रधान (६४) यांच्या हाताला व पायाला भाजले आहे. त्यांना उपचाराकरिता खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी घरामध्ये लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून ५.३० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली.

