अग्निसुरक्षेबाबत गणेश मंडळे बेपर्वा

पोलिसांनी प्रत्येक मंडळांना ४० कलमी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.

८२६ पैकी केवळ २५ मंडळांचे अर्ज; अवघ्या एका मंडळाला ‘ना हरकत दाखला’

वसई-विरारमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अग्निसुरक्षा तपासणी करून घेण्याच्या सूचनेकडे पाठ फिरवली आहे. शहरात ८०० सार्वजनिक मंडळे असून त्यांपैकी केवळ २५ मंडळांनी अग्निसुरक्षा तपासणीसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांपैकी केवळ एका मंडळाला ‘ना हरकत दाखला’ मिळाला आहे.

गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये आणि तो सुखरूप पार पडावा यासाठी पोलीस आणि पालिकेने मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना विविध सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी प्रत्येक मंडळांना ४० कलमी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यात अग्निसुरक्षा तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र बहुतांश मंडळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वसई-विरार शहरात ८२६ सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे असून २५ हजार खासगी अर्थात घरगुती गणपती आहेत. या ८२६ पैकी पालिकेकडे आतापर्यंत केवळ २५ मंडळांनी अग्निसुरक्षा तपासणीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील एका मंडळाच्या मंडपाची तपासणी करून त्याला ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागाने दिले आहे. या तपासणीत विद्युत उपकरणे, वीजजोडण्या योग्य आहेत की नाही ते तपासले जाते.

आग लागल्यास ती विझवण्यासाठीची उपकरणे आहेत का, बाहेर पडण्याचे मार्ग योग्य आहेत का ते तपासले जाते. आग विझवण्यासाठी उपकरणे आणि रेतीच्या गोण्या ठेवणे बंधनकारक असते.

त्याची तपासणी करूनच मंडप उभारण्यास ना हरकत दाखला दिला जातो. मात्र मंडळांनी अशी अग्निसुरक्षा करून घेण्याबाबत उदासीनता दाखवली आहे.

प्लास्टिकचा सर्रास वापर

प्लास्टिक हे ज्वलनशील असते. त्याचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या होत्या; परंतु पावसाची शक्यता गृहीत धरून अनेक मंडळांनी प्लास्टिकचा सर्रास वापर केला आहे. अग्निसुरक्षा तपासणी न करणाऱ्या मंडळांवर काय कारवाई करणार ते मात्र गुलदस्त्यात आहे.

अग्निसुरक्षेसंदर्भातील सर्व सूचना गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या आहेत. त्याचे पालन त्यांनी करणे आवश्यक आहे. शहरात ८०० हून अधिक सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांनी अग्निसुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक आहे. क्षुल्लक चुकीमुळे आग लागू शकते. मंडपात शेकडो भाविक असतात. त्यांचा जीव एक प्रकारे धोक्यात असतो.

रोशन राजतिलक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire security issue neglected by ganpati mandal

ताज्या बातम्या