अंबरनाथः अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना आणि बुधवारी शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असतानाच भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील प्रभाग क्रमांक चार येथील नवीन भेंडीपाडा येथे पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा हल्ला झाला.

दोन अज्ञात दुचाकीवरून आले त्यातील एकाने चार गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होत असताना झालेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक तब्बल साडे दहा वर्षांनंतर होते आहे. या निवडणुकीता शिंदेंची शिवसेना विरूद्ध भाजप अशी थेट लढत होते आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. यात भाजपकडून भाजपचे पदाधिकारी गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर समोर शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याच वाळेकरांचा पुतण्या पवन वाळेकर हा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रभाग क्रमांक चारमधून पवन वाळेकर यांच्यासमोर मनिषा वाळेकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक निखील वाळेकर यांचे आव्हान आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये कौटुंबिक लढाई होते आहे. शहराती लक्ष्यवेधी लढायांमध्ये ही लढाई मानली जाते. त्यामुळे येथे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपर्यंत हेच पवन वाळेकर शिंदेंच्याच शिवसेनेत होते. मात्र तिकिट न मिळाल्याने त्यांनी भाजपात जाण्याचा पर्याय स्विकारला होता.

या पवन वाळेकर यांच्या भूपती वेंचर या नविन भेंडीपाडा येथील कार्यालयावर मंगळवारी मध्यरात्री सव्वा १२ च्या सुमारास गोळाबार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाहन क्रमांक प्लेट नसलेली एक दुचाकी या कार्यालयासमोर येते. त्यावर दोन अज्ञात पांढरे कपडे परिधान करून शिरस्त्रान घालून येतात. त्यातील मागे बसलेला अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून उतरून कार्यालयाच्या दिशेने सुरूवातीला तीन आणि नंतर एक गोळी चालवतो. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळ काढतात. तात्काळ कार्यालयातून एक जण बाहेर येऊन दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो.

मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरतात, असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेनंतर शहरात एकच बळबळ माजली आहे. अंबरनाथ शहराच प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी येत असताना त्याच्या काही तास आधी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. याप्रकरणी संशयीत आरोपींची नावे सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पवन वाळेकर यांना लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांना धक्का बसला आहे. ही शहराच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया भाजपचे अभिजीत करंजुले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.