लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे – दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर असल्याचा आरोप करत विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसर येथे मॉरिस नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह करत गोळीबार केला. या गोळीबारात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर मॉरिस याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मॉरिस याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले.

आणखी वाचा-मुरबाड – शहापूर तालुक्यांची उन्हाळ्यात टँकर आणि विंधन विहिरीवर भिस्त, जिल्हा प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांचा उपायोजना आराखडा

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिस याचे उदात्तीकरण सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मॉरिस याचे सामनामध्ये आलेले वृत्तदेखील माध्यमांना दाखवले. उबाठा गटाचे पक्षप्रमुख आणि उबाठाचे युवानेता यांच्या मार्गर्शनाखाली मला काम करायचे आहे असे मॉरिस याने त्याच्या अनेक बॅनरमध्ये म्हटले होते. कालचा गँगवार हा उबाठा गटात झाला आहे. नगरसेवक मी होणार की तू होणार, एकमेकामधील स्पर्धेमुळे हा प्रकार झालेला आहे, असेही सामंत म्हणाले. असा प्रकार घडणे हे दुदैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. परंतु काहीजण राजकारण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करत आहेत. ही प्रवृत्ती वाढत आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. मॉरिस याला मोठे करण्याचे काम सामनामधून, तर घोसाळकर यांच्या सामाजिक कार्याला मातोश्रीमधून सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. एखादी वाईट घटना घडली तर ती शिंदे यांच्यामुळे घडली आणि एखादी चांगली घटना घडली तर ती आम्ही यापूर्वी केली अशा प्रकारची भूमिका काही लोक राजकारणात मांडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

आणखी वाचा-डोंबिवली एमआयडीसीत कमी दाबाने पाणी पुरवठा, रहिवासी हैराण

त्या तडजोडी मागे कोण?

मॉरिस हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटला. त्यापेक्षा घोसाळकर हे गोळीबाराचा प्रकार घडण्यापूर्वी कोणाला भेटले. याचा देखील तपास व्हायला हवा. फेसबुक लाइव्हमध्ये तडजोड झाली त्यामागे कोण होते. हे जनतेसमोर आले पाहिजे, असेही सामंत म्हणाले

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in dahisar is gang war within the thackeray group industries minister uday samant alleges mrj
First published on: 09-02-2024 at 13:49 IST