Premium

कल्याण: टिटवाळ्यात महावितरणच्या ठेकेदारावर गोळीबार

टिटवाळा येथील सावरकर नगरीत राहत असलेल्या महावितरणच्या एका ठेकेदारावर रविवारी रात्री एका मोटारीतून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला.

umesh salunkhe
(उमेश साळुंखे)

कल्याण- टिटवाळा येथील सावरकर नगरीत राहत असलेल्या महावितरणच्या एका ठेकेदारावर रविवारी रात्री एका मोटारीतून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला. ठेकेदाराच्या छातीत गोळी घुसल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने टिटवाळ्यात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश साळुंखे (५२) असे ठेकेदाराचे नाव आहे. महावितरणचे विद्युत मीटर बसविण्याचे काम त्यांच्याकडे आहे. रविवारी रात्री साडे आठ वाजता भोजन झाल्यानंतर टिटवाळ्यातील आपल्या घराबाहेर ते बसले होते. त्याच वेळी घराबाहेर एक काळ्या रंगाची मोटार उभी राहिली. परिचित व्यक्ति आली असेल म्हणून ते उभे राहिले.

हेही वाचा >>>ठाणे: चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले

तेवढ्यात मोटारीतील हल्लेखोराने उमेश यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केले. ते जमिनीवर कोसळताच हल्लेखोर तेथून पळून गेले. उमेश यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करुन मुंबईतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

हेही वाचा >>>ठाण्यात समूह विकास मार्गी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पास प्रारंभ

टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Firing on the contractor of mahavitaran in titwala kalyan amy