वाहतूक पोलिसांना प्रथमोपचार प्रशिक्षण

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णासाठी सुरुवातीचे काही तास खूप महत्त्वाचे असतात.

युनायटेड वे संस्थेचा अभिनव उपक्रम; ४०० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य
ठाणे : रस्ते अपघातात जखमी झाल्यांनतर अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी वेळीच प्रथमोपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता खूप जास्त असते. अपघातानंतर घटनास्थळी सर्वप्रथम पोलीस हजर होतात. या पार्श्वभूमीवर मुंबई

येथील युनायटेड वे या संस्थेतर्फे  ठाणे शहर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागातील साहाय्यक मोटर वाहक निरीक्षकांना अपघातग्रस्ताला प्रथमोपचार कसे द्यावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णासाठी सुरुवातीचे काही तास खूप महत्त्वाचे असतात. या तासांमध्ये वेळीच उपचार नाही मिळाले तर रुग्णाचा मृत्यू होऊ  शकतो. हे मृत्यू रोखण्यासाठी आणि रुग्णाला सुरुवातीच्या काही तासांत प्रथमोपचार मिळावे यासाठी युनायटेड वे संस्थेतर्फे जीवनदूत अभियान राबविले जात आहेत. या अभियानाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना अपघात झाल्यानंतर रुग्णाची कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जात आहे. छोटा अपघात असेल तर अधिक रक्तस्रााव होऊ  नये म्हणून लगेच मलमपट्टी करणे. मोठा अपघात झाल्यास १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णाची परिस्थिती कळवून विविध उपकरणांनी सज्ज अशी रुग्णवाहिका मागवणे. दुचाकीस्वारांचा अपघात झाल्यास त्यांनी हेल्मेट घातले असेल तर ते कशा पद्धतीने काढावे जेणेकरून अजून जास्त इजा होणार नाही. अपघात झाल्यावर रुग्णाला लगेच पाणी द्यावे की नाही, रुग्णवाहिकेत रुग्णाला योग्य पद्धतीने उचलून त्यात झोपवणे, अपघात झालेल्या ठिकाणाची गर्दी हटवण्यासाठी आणि रुग्णाला

मोकळी हवा मिळण्यासाठी

एका विशिष्ट पद्धतीने रुग्णाभोवती दुचाकींची त्रिकोणी मांडणी करणे या सर्व पद्धतीचे प्रशिक्षण संस्थेतर्फे  पोलिसांना दिले जात आहे. प्रशिक्षण देण्यासाठी डॉक्टरांसह, अपघाततज्ज्ञ त्याचबरोबर प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी रुग्णवाहिकेची देखील सोय संस्थेतर्फे करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मलमपट्ट्या, चारचाकीचा अपघात झाल्यावर त्यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी ग्लास कटर, पोलिसांना रेडियम जॅकेट आणि प्रथमोपचारासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी संस्थेतर्फे देण्यात येत आहेत. ठाणे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आरटीओ अधिकारी मिळून एकूण ८० जणांना हे  प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काळात चारशे पोलिसांना हे प्रशिक्षण देण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत.

व्यावसायिक चालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

ठाणे आणि नवी मुंबई येथील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रकचालक आणि इतर अवजड वाहन चालविणाऱ्या एकूण १ हजार ४०० चालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याचे काम संस्थतर्फे  सुरू आहे. हे सर्व चालक आपल्या कामानिमित्त जास्त वेळ रस्त्यांवर असतात त्यामुळे या चालकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. पोलिसांच्या मदतीने शहरातील अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती घेऊन तेथील नागरिकांनादेखील प्रशिक्षण देण्याचे काम संस्थेतर्फे  करण्यात येणार आहे.

अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळाल्याने अनेकांचा जीव वाचू शकतो. रस्ते अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि व्यावसायिक वाहनचालक उपलब्ध असतात. त्यामुळे जीवनदूत अभियानाअंतर्गत यांना प्राधान्याने प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. – अजय गोवले, उपाध्यक्ष, युनायटेडवे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First aid training to traffic police akp

ताज्या बातम्या