महाराष्ट्रासाठी काळजीची बातमी आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे (First corona omicron virus patient in Maharashtra). या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्यानं या करोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा काळजीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होता (Omicron in Kalyan Dombivali Mumbai). तो दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण आहे.

रूग्णाच्या अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध, सर्वजण करोना निगेटीव्ह

कल्याण डोंबिवलीतील या रूग्णाला २४ नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय या रूग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. ते सर्व कोविड निगेटीव्ह निघाले आहेत. दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासातील रूग्णाच्या २५ सहप्रवाशांची देखील करोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक?

दक्षिण अफ्रिकेत सर्वप्रथम ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाहूल लागलेल्या डॉ. अँजेलिक कोट्झी यांनी यासंदर्भात एएनआयला दिलेल्या एक्स्क्लुजिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणतात, “ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बीटा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्युटेशन असलेला व्हेरिएंट आहे. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग अधिक असतो. शिवाय, तुम्हाला जर या व्हेरिएंटची लक्षणं माहिती नसतील, तर त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष होऊ शकतं इतका तो बेमालूमपणे पसरू शकतो”.

Omicron ची लक्षणं काय?

डॉ. कोट्झी यांनी सर्वप्रथम या नव्या व्हेरिएंटची माहिती जगाला दिली होती. त्यांनी तपासणी केलेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून ओमायक्रॉनची संभाव्य लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. त्या म्हणाल्या, “मी तपासलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने थकवा हे लक्षण दिसून आलं. अंगदुखी देखील जाणवू शकते. काहींना प्रचंड डोकेदुखी आणि थकवा आला होता. पण यापैकी कुणीही वास किंवा चव गेल्याची तक्रार केली नव्हती. तसेच, नाक बंद होणं किंवा खूप जास्त ताप देखील दिसून आला नाही”.

हेही वाचा : “ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट नक्कीच येऊ शकते, पण…”, सीएसआयआर संचालकांनी फेटाळून लावली ‘ही’ शक्यता!

हे फक्त प्राथमिक अंदाज, अजून संशोधन सुरू

दरम्यान, हे सर्व अंदाज किंवा निरीक्षणं प्राथमिक पातळीवरील असून त्यावर अद्याप संशोधन आणि अभ्यास सुरू असल्याचं डॉ. कोट्झी यांनी स्पष्ट केलं. “म्युटेशनच्या बाबतीत ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बिटापेक्षा खूप वेगळा आहे. जेव्हा आमच्या वैज्ञानिकांनी या व्हेरिएंटबाबत जगाला सांगितलं, तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की त्यांना ओमायक्रॉनबाबत सर्वकाही माहिती नाही. ते सध्या फक्त त्याचं सिक्वेन्सिंग करत आहेत”, असं त्या म्हणाल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First corona omicron virus patient found in kalyan dombivali maharashtra pbs
First published on: 04-12-2021 at 19:39 IST