उल्हासनगर : सोमवारी नवे शैक्षणिक वर्ष नव्या उत्साहाचा सुरू झाले. यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज होत्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. कुठे फुलांनी स्वागत होत होते. तर कुठे मुलांसाठी शाळा सजवण्यात आल्या होत्या. उल्हासनगरातील यशवंत विद्यालयाच्या प्राथमिक विभागात शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे शिऱ्याने तोंड गोड करून स्वागत करण्यात आले. या वातावरण आणि रंगीबेरंगी सजावटीने नटलेला शाळेचा परिसर यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यंदाच्या वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. सोमवारी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरातील शाळांमध्ये शाळा प्रवेशाचा उत्साह दिसून आला. सकाळी आणि दुपारी अशा दोन्ही सत्रात विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश पार पडला. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी तयारी केली होती. काही शाळांमध्ये फुलांची सजावट, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट करण्यात आली होती.
उल्हासनगरच्या श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ झाला. शाळेचा परिसर फुलांनी आणि फुग्यांनी सजला होता. प्रत्येक वर्गखोली रंगीत सजावटींनी नटली होती आणि प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबाच्या फुलांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या नजरेतील उत्साह आणि नव्या वर्षाबद्दलची उत्सुकता यामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न झाले. विद्यार्थ्यांनीही आनंदाने नाचत, खेळत आणि हसत या नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली.
शाळेच्या वतीने नव्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली, ज्यामुळे पालकांना दिलासा मिळाला. मध्यान्ह भोजनात सर्वांना गोड शिरा देऊन शाळेने या नव्या प्रवासाला गोड आठवण जोडली. हा प्रवेशोत्सव केवळ औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आपुलकी आणि आनंद निर्माण करणारा अनुभव ठरला. यशवंत विद्यालयातील ही उत्साहपूर्ण सुरुवात विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची गोड नोंद ठरली.
अंबरनाथमधील शाळांचा कायापालट
अंबरनाथ पालिकेने शाळा क्रमांक १ आणि १३ च्या जीर्ण इमारती पाडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ९ कोटींच्या निधीतून नव्या, भव्य इमारती उभारल्या. १६ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा क्रमांक १, १३ आणि ११ चा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी एका लहान विद्यार्थ्याच्या शुभ पावलांचा वर्गात ठसा उमटवून स्वागत करण्यात आले. अत्याधुनिक वर्ग, नवीन बाक, स्वच्छ शौचालय, खेळाचे मैदान, फुलांचे उद्यान आणि रंगीत भिंतींनी सजलेल्या शाळेत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह दिसला. शिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालयही उपलब्ध आहे. सोहळ्याला मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख चौधरीउपस्थित होते.