मुबलक मासळींमुळे मच्छीमार सुखावले; ग्राहकांची प्रत्यक्ष किवावर जाऊन खरेदी

पावसाचा जोर ओसरल्यानंतर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा किवाच्या मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे. समुद्राच्या दिशेने जाणारे नदी आणि नाल्याचे पाणी कृत्रिम बांधाने अडवून त्यावर जी मासेमारी केली जाते त्याला किवाची मासेमारी म्हणतात. यंदा अशा माशांचे चांगले उत्पादन झाल्याने जोडधंदा म्हणून किवाची मासेमारी करणारे शेतकरी आनंदात आहे.

भाताची लागवड आणि निंदणीचे काम संपल्यानंतर पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी किवाची मासेमारी करतात. दरवर्षी गौरी-गणपती सणाच्या आसपास ही मासेमारी होत असते. वसई तालुक्यातील पूर्वेच्या ग्रामीण भागात या मासेमारीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे.

 किवाची मासेमारी कशी होती?                                                                                                                   

पावसात नदी, नाले, ओहोळ ओसंडून वाहतात. पावसाचा जोर ओसरल्यानंतर ओहोळ, नाले आणि उपनद्यांचा प्रवाह समुद्राच्या दिशेने होतो. नदीच्या मुख्य ओहोळात शेतातून वाहत जाणारे पाणी बांध बांधून अडवले जाते. बांधाच्या मध्यावर पाण्याचा प्रवाह सोडून बांबू, सागाची पाने, दगड व लाकडाचे कीव बनवले जाते. त्यानंतर बांबूच्या साटय़ावर जाळी ठेवून पारंपरिक पद्धतीने ही मासेमारी केली जाते. त्याला किवाची मासेमारी म्हणतात.  पावसाळ्यात पाऊस पडताच नदी-नाल्यातील, डोंगर-कपाऱ्यातील तसेच धरणातील मासे शेतात व डबक्यात अंडी देतात. त्याला बोलीभाषेत ‘वल्गन’ चढली असे म्हणतात. वल्गनीच्या अंडय़ांपासून तयार झालेले मोठे मासे प्रवाहाबरोबर नदी-नाल्यात जात असतात. हेच मासे याच मार्गावर कीव मांडून अडवले जातात आणि मासेमारी केली जाते.

विविध प्रकारचे मासे

किवात अनेक प्रकारचे मासे मिळतात. त्यात कडवाळी, मळे, कोळंबी, चिंबोरी, निवटी, खरबी, खाजरी यांचा समावेश असतो. हे मासे कॅल्शियमयुक्त असल्याने याचाही एक मोठा खवय्या वर्ग आहे. खवय्ये ग्राहक प्रत्यक्ष किवावर जाऊन ताजे मासे खरेदी करतात. यंदा हे मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विक्री न झालेल्या माशांना हळद व मीठ लावून चुलीवर बांबूची मखरी किंवा उतन बनवून सुकवले जात आहेत. या सुकवलेल्या माशांनाही पायलीला ५०० ते ६०० रुपये भाव मिळत असल्याचे शेतकरी शरद किणी यांनी सांगितले.

किवाच्या ताज्या माशांचा खास खवय्या वर्ग असून त्याला चांगली मागणीही आहे. त्यामुळे शेती लागवडीनंतर एक जोडधंदा म्हणून किवाच्या मासेमारीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्नही मिळते. साधारण भाद्रपद महिन्यात भरपूर मिळणारे किवाचे मासे हळूहळू कमी होत जाऊन शेतातील पाणी वाहणे चालू असेपर्यंत मिळतात.

आशालता कुडू, शेतकरी, खानिवडे