राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

मासळीच्या साठय़ाचे जतन तसेच मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण व्हावे या हेतूने पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात येते. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.

या काळात मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रकियेस वाव मिळून मासळीच्या साठय़ाचे जतन होते, तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवितहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते.

  • राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौका या कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार नौका आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल आणि मच्छीमाराला दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास मच्छीमाराला शासनाकडून भरपाई व मदतनिधी मिळणार नाही.
  • १ जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना १ जूननंतर कोणत्याही परिस्थितीस बंदरात मासे उतरविण्यास परवानगी नसेल.