कल्याण : कल्याणमधील शिवसेना, भाजप, एमआयएमचे पाच नगरसेवक, दोन माजी नगरसेवक आणि या पक्षाच्या १५० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये कल्याण पश्चिमेतील मुस्लीम मोहल्ल्यातील ९० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश नेते प्रमोद हिंदूुराव, आनंद परांजपे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते.
अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएमच्या नगरसेविका तन्झिला अयाज मौलवी, नगरसेवक फैजल जलाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आगामी कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून या पक्षप्रवेशांना विशेष महत्त्व आहे. गेल्या वर्षी शिवसेनेने पालिका हद्दीतील भाजपच्या सात नगरसेवकांना गळाला लावले. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने गळ टाकून अपक्ष, शिवसेना, भाजपमधील काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी जोरदार तयारी चालविली होती. तीन महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील आडिवली ढोकळी प्रभागाचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. कुणाल यांनी सेनेत यावे म्हणून जोरदार हालचाली सेनेतून सुरू होत्या. त्याला पाटील दाद देत नव्हते. दरम्यानच्या काळात कुणाल यांच्यावर फेरीवाल्यांकडून हप्ता घेण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा म्हणजे एक राजकीय खेळी असून आपण एका पक्षात प्रवेश करत नसल्याने आपणास अडकविण्यात आल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी सेनेऐवजी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे संकेत दिले होते.
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याच्या विषयांवरून कल्याणमधील मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. आता मोहल्ल्यातील एमआयएमच्या तन्झिला मौलवी व त्यांच्या ९० हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.