ठाणे : दिव्यांग तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांना शुक्रवारी ठाणे न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यातील चार आरोपींना २० वर्षे, तर एकाला १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाण्यात  ८ जानेवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती.

गोपी बोरा (४३), बालाजी खरात (२८), राजेश मौर्या (२३), कमलनाथ गुप्ता (३४) आणि विजय गुप्ता (२७) अशी आरोपींची नावे आहेत.  ठाण्यात राहणारी पीडित मुलगी   ८ जानेवारी २०१६च्या रात्री  परिसरातच राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे कामानिमित्त गेली असता, शेजारी राहणाऱ्या गोपी बोरा याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बालाजी खरात याने तिला रिक्षातून पळवून नेऊन त्याचे साथीदार राजेश, कमलनाथ आणि विजय यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्तकनगर पोलिसांनी खरात आणि त्याच्या तीन साथीदारांसह बोरा याला अटक केली. शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी सर्व आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.