महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी नवीन करोना चाचणी केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांवर आरोग्य विभागाच्या पथकाने चाचण्या करण्याचे काम सुरू केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ३० आरोग्य केंद्रे आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करोना चाचणी केंद्रे सुरू आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाचे रुग्ण वाढू लागले असून शहरात दररोज शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आणखी पाच नवीन करोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार पातलीपाडा उड्डाणपूल, कॅडबरी नाका उड्डाणपूल, कासारवडवली, ठाणे रेल्वे स्थानक आणि सॅटिस पूल याठिकाणी पालिकेने चाचणी केंद्रे उभारली आहेत.

घोडबंदर आणि वर्तकनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून यामुळे या भागात ही तीन केंद्रे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी पालिकेच्या पथकाने करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. या केंद्रांवर ६० टक्के आरटीपीसीआर तर ४० टक्के शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत.