कल्याण: टिटवाळ्यात आपल्या नातेवाईकांकडे राहत असलेल्या एका २१ वर्षाच्या तरूणीला गुंगीचे औषध देऊन, तिला मद्य पाजण्यास देऊन तिला बेशुध्द करून तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच तरूण, आणि पीडित तरूणीच्या दोन मैत्रिणी अशा एकूण सात जणांच्या विरुध्द पीडित तरूणीच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी मंगळवारी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्यातील तक्रारीत पीडित तरूणीने म्हटले आहे की, मी टिटवाळा येथे माझ्या काकीकडे राहते. मी स्वत: कल्याणमध्ये एका बांधकाम कंपनीत नोकरी करते. घरात एक जण रिक्षा चालवतो. या मिळकतीमधून आमचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या मार्चमध्ये आपले रात्रीच्या वेळेत काकी बरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून मी रात्रीच टिटवाळ्यात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. मैत्रिणीचे कुटुंबीय घरी होते. त्यांनी मला आधार दिला.
मैत्रिणीच्या शेजारीच माझी अन्य दुसरी मैत्रिणपण राहत होती. त्यामुळे मी काकीच्या घरी न जाता दहा दिवस माझ्या दोन्ही मैत्रिणींच्या घरी आलटून पालटून राहत होते. दहा दिवसानंतर सकाळी मी माझ्या काकीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. हा विषय मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या मित्राला फोन करून बोलून घेतले. आपणास माझ्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडायचे आहे असे सांगितले. मित्राने त्याच्या इतर चार मित्रांना फोन करून बोलावून घेतले. एका मोटारीत बसून मैत्रिणींसह ते पीडितेला घेऊन तिच्या घरी सोडण्यास निघाले होते.
मोटार पीडितेच्या घराकडे न वळता एनआरसी कंपनीच्या दिशेने निघाल्यावर पीडित तरूणीने मला कुठे घेऊन चालला आहात, अशी विचारणा चालकाला केली. त्याने एनआरसी कंपनीच्या मागील बाजूस चाळीचे बांधकाम सुरू आहे. ते पाहू मग तेथून तुला तुझ्या घरी सोडतो असे सांगितले. कंपनीच्या पाठीमागील बाजूस एका खोलीत गेल्यावर तेथे पीडितेच्या मैत्रिणीने गप्पा मारत असताना अचानक पीडितेच्या मानेवर गुंगीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर काय झाले पीडितेला कळले नाही. आपणास शुध्द आली तेव्हा आपण कल्याणमध्ये गुन्हा दाखल इसमाच्या विश्रांती कार्यालयात असल्याचे समजले. माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता. माझ्याशी गाडीतील तरूणांनी मी बेशुध्द झाल्यावर काही गैरवर्तन केल्याचे मला जाणवले. चार दिवसांनी मी शुध्दीवर आले. त्यावेळी मला गुन्हा दाखल तरूणाने घडल्या घटनेबद्दल कोठेही बोलायचे, तक्रार करायची नाही. नाहीतर तुला फाशी देईन. तुझ्या कुटुंबीयांना ठार मारीन, अशी धमकी दिली.
घडल्या प्रकाराने मला खूप थकवा जाणवत होता. मी घरी आल्यानंतर काकीला घडला प्रकार सांगितला. कुटुंबीयांशी चर्चा करून पीडित तरूणीने दोन मैत्रिणी आणि पाच जणांच्या विरुध्द टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रभागा मधे यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांमध्ये मुरबाड भागातील एक निवृत्त प्राध्यापक, एका राजकीय पक्षातील कार्यकर्त्याचा सहभाग असल्याची चर्चा आहे.