बदलापूर : काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरांच्या किमती वाढवण्याची घोषणा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. वाढत्या महागाईचे कारण देत प्रति चौरस फूट ५०० रुपयांनी या किमती वाढवण्यात आल्या. याचा घरखरेदीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असतानाच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बदलापूर शहरात तब्बल पाच हजार घरांची विक्री झाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे दर्जेदार घरांना ग्राहकांनी पसंती दिल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी परवडणारी घरे मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मुंबई आणि ठाणेपल्याड अंबरनाथ आणि बदलापूर शहराकडे पाहिले जात होते. गेल्या काही वर्षांत परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीमुळे या दोन्ही शहरांतील घरांच्या किमती वाढल्या नव्हत्या. मात्र त्याच वेळी आसपासच्या शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे दर्जेदार घरे देण्याच्या प्रयत्नात दोन्ही शहरांतील बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीला आले होते. त्यामुळे अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने या दोन्ही शहरांतील घरांच्या किमती प्रति चौरस फूट पाचशे रुपयांनी वाढवण्याची घोषणा करण्यात आली. बांधकाम साहित्याचे दर जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढले असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. या निर्णयामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील घरांकडे मध्यमवर्गीय पाठ फिरवतील अशी भीती होती. मात्र या घोषणेनंतरही गेल्या दोन महिन्यांत एकटय़ा बदलापूर शहरात सुमारे पाच हजार घरांची विक्री झाल्याची माहिती अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे सचिव संभाजी शिंदे यांनी दिली आहे. बदलापूरच्या एक दुय्यम निबंधक कार्यालयात दोन महिन्यांत तीन हजार घरांची नोंदणी झाल्याची नोंद आमच्याकडे
आहे.
बदलापूर पश्चिमेतही असेच एक निबंधक कार्यालय आहे. दोन्ही मिळून सुमारे पाच हजार घरांची विक्री झाल्याची माहिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे घरांच्या किमती प्रति चौरस फूट वाढल्या असल्या तरी दर्जेदार घरांना ग्राहकांनी पसंती दिल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे.