युवासेनाच्या शाखाधिकाऱ्याचाही समावेश, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे कार्यलयाची तोडफोड

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात आणि त्यांचेच पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरातील त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयावर शनिवारी काही शिवसैनिकांनी हल्ला करत कार्यालयाची मोडतोड केली होती. याप्रकरणी उल्हासनगरातील विविध शाखांचे पाच शाखाप्रमुख आणि एका युवा सेना शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तर काहींनी कार्यालयात धाव घेतली होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोन दिवसांनंतर मुंबई आणि राज्यातील काही ठिकाणी बंडखोर आमदारांविरूद्ध स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सुरूवातीला समाजमाध्यमांवरून सुरू असलेला पाठिंबा आणि विरोधाचा खेळ शुक्रवारपासून हल्ल्यामध्ये रूपांतरीत झाला. मुंबई, कोकण आणि राज्यात बंडखोर आमदारांविरूद्ध संतप्त प्रतिक्रीया उमटत असतानाच ठाणे जिल्ह्यात मात्र कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र शनिवारी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात आणि त्यांचेच पुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला. यावेळी दगडांनी कार्यालयाच्या मुख्य फलक तोडण्यात आले. तेथे हजर असलेल्या पोलिसांनी तात्काळ या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात शनिवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांमध्ये पाच शाखा प्रमुखांचा आणि एका युवासेना अधिकाऱ्याचा समावेश आहे. उल्हासनगरच्या टिळकनगर शाखेचे शाखाप्रमुख सुरेश पाटील, वाल्मिकिनगरचे शाखाप्रमुख नितिन बोथ, झुलेलाल चौकचे शाखाप्रमुख उमेश पवार, खेमाणीचे शाखाप्रमुख संतोष कणसे, कॅम्प एकच्या शाळा क्रमांक २४ येथील शाखाप्रमुख लतेश पाटील यांच्यासह युवासेना शाखाधिकारी बाळा भगुरे यांचा समावेश आरोपींमध्ये आहे. या घटनेनंतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तर काहींनी मोडतोड झालेल्या कार्यालयात धाव घेतली. जिल्ह्यातील या पहिल्याच प्रकारानंतर उल्हासनगर शहरातील शिवसेनेत दोन गट उघडपणे दिसून आले आहेत. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हल्ल्यातील आरोपींना पाठिंबा दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.