ठाणे – मागील वर्षेभरापासून आम्ही या इमारतीत एकत्र राहत आहोत. पिंकी आणि तिच्या नवऱ्याचा स्वभाव इतका प्रेमळ होता की, अनोळखी कधी वाटलेच नाही. पिंकीचे सर्वांशीच आपलेपणाचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे तिच्या निधणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचे कळव्यातील शेजाऱ्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) हीचा देखील मृत्यू झाला. तिने आणि तिच्या पतीने काही वर्षांपूर्वीच कळव्यात घर घेतले होते. या घरात तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव पुन्हा मुंबई येथे नेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवार बारामती येथे विमानाने जाणार होते. या विमानात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिची नियुक्ती झाली होती. विमानाने उड्डाण घेतले आणि बारामती दृष्टीक्षेपात आली. त्याच वेळी अचानक विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान कोसळू लागले. या अपघातात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला.
पिंकी माळी यांचा दोन ते अडीच वर्षापूर्वी सोमविकार सैनी यांच्याशी विवाह झाला होता. दीड वर्षांपूर्वी पिंकी आणि तिच्या पतीने कळवा येथील रिव्हिरिया सोसायटी मध्ये घर घेतले होते. ती पतीसह गेले एक वर्षापासून कळव्यात राहत होती. त्यामुळे तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तिच्या कळव्यातील घरी आणले होते. यावेळी तिच्या शेजाऱ्यांनी तसेच इमारतीतील रहिवाशांनी तिच्या घराजवळ गर्दी केली होती. अनेकांसोबत पिंकीचे अवघ्या काळातच चांगले नाते निर्माण झाले होते. त्यामुळे पिंकीचे पार्थिव बघून त्यांना अश्रू अनावर झाले.
येत्या एक दोन दिवसात नविन घराची पूजा घालण्याचे नियोजन…
पिंकीचा प्रेमळ स्वभाव होता. आम्ही पाच ते सहा महिन्यांपासून एकमेकांचे शेजारी आहोत. पण, पिंकी आणि तिच्या नवऱ्याच्या वागण्यातून कधी असं जाणवलं नाही की, ही ओळख नविन आहे. सर्वांशी आपलेपणाने दोघेही बोलत. पिंकी सगळ्यांची विचारपूस करत. कोणत्या नेत्यासोबत दौऱ्याला जाणार आहे याचे अपडेट ती आम्हाला देत असे. तिच्या नवऱ्याने नुकतेच घराच्या फर्निचरचे काम करायला घेतले होते. सर्व गोष्टी तो तिच्या आवडीने करत होता. काही दिवसातच तो सत्यनारायणाची पूजा देखील घालणार होता, हे पिंकीचे वय जाण्याचे नव्हते. खूप दु:ख होत आहे आम्हाला हसती-खेळती मुलगी आज आम्हाला सोडून गेली आहे, अशा भावना पिंकी माळीचे कळव्या येथील शेजारी मंगेश नवले यांनी व्यक्त केली.

