ठाणे : राज्यातील शहरांमध्ये नुकत्याच वस्त्या वाढत असून त्याला आकार नाही. या शहर नियोजन अभावामुळेच पूरपरिस्थिती निर्माण होत आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पूर आलेल्या भागांची पाहाणी करणे वाईट नाही पण, दौऱ्याबरोबर मदत कार्य करणेही महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात पहिल्यांदाच पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. यापूर्वीही दोनदा राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थिती उद्भवण्याचे एकमेव कारण म्हणजे कोणत्याही गोष्टीचे नियोजन नाही.   राज्यातील कोणत्याही शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणत्याही सरकारला वेळ नाही. कोणतेही नियोजन नाही आणि शहर नियोजनही नाही. यामुळे अशी परिस्थिती यापुढेही उद्भवत राहणार आहे, अशी टीका त्यांनी केली.