शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता राज्यभरातील बाजारपेठांमध्ये दिसण्यास सुरूवात झाली आहे. ठाण्यातील बाजारपेठेत यामुळे भाज्या आणि दूधाचा तुटवडा जाणवत असतानाच फुलांची आवकही मंदावली आहे. ठाण्यात मुख्यत्तेवकरून पुणे आणि नाशिक येथून फुले आणली जातात. मात्र, कालपासून सुरू झालेल्या संपामुळे ही आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी बळीराजाने कालपासूनच संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे काल पुणे व नाशिक जिल्ह्यातून फुलांचा साठा बाजारात आलेला नाही. आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहिल्यास फुलाचे भाव तिप्पटीने वाढू शकतात. ठाण्यातील बाजारपेठेत दररोज पुणे, नाशिक आणि तासगाव येथून झेंडू, लिली, मोगरा ,गुलछडी ही फुले येत असतात. याठिकाणी दररोज तीन क्विंटल फुलांची विक्री होते. मात्र, कालपासून सुरू झालेल्या संपामुळे दोन दिवसांपासून फुले दाखल झालेली नाहीत. याशिवाय, उद्या पुण्याच्या गुलटेकडी बाजार बंद होणार आहेत. त्यामुळे आता संप मागे घेण्यात आला तरी ठाण्यात ताजी फुले सोमवारीच दाखल होऊ शकतात.
शेतकरी संपाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा, मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली
राज्यातील शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचेदेखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या वतीने सरकारसोबत चर्चा करण्याची माझी तयारी आहे. हा विषय संवादाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो,’ असे अण्णा हजारे यांनी म्हटले.
शेतकऱ्यांच्या संपाविषयी एका प्रसिद्धीपत्रातून अण्णा हजारे यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी,’ असे अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असल्यास, मी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला तयार आहे,’ असेदेखील अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.