भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्याने रखडलेले काम पूर्ण

कल्याण : टिटवाळा, आंबिवली, मोहने परिसर कल्याण शहराला उड्डाणपूलमार्गे जोडणारा मोहने-वडवली रेल्वे फाटकावरील महत्त्वाचा नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. १८ महिन्यांत बांधून पूर्ण करण्यात येणारा हा पूल मागील ११ वष्रे रखडला होता. गेल्या दोन वर्षांपासून या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादनाची प्रक्रिया पालिकेकडून पूर्ण करण्यात आल्याने रखडलेले काम आता पूर्ण झाले आहे. श्रेय घेण्यासाठी नवीन उड्डाणपूल उत्सवी रूपात राजकीय मंडळींना सुरू करायचा आहे. राजकीय मंडळींना वेळ नसल्याने पुलाचे उद्घाटन रखडले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रेल्वे मार्गातील रेल्वे फाटक बंद करायची असल्याने त्या फाटकांच्या भागात उड्डाणपूल बांधावेत. या कामासाठी रेल्वेकडून पालिकेला सहकार्य केले जाईल, अशी सूचना रेल्वेकडून पालिकेला करण्यात आली होती. रेल्वेच्या सूचनेप्रमाणे पालिकेने ठाकुर्ली, विठ्ठलवाडी एफ केबीन, टिटवाळा, वडवली-मोहने रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव १४ वर्षांपूर्वी मंजूर केला होता. पुलाच्या दोन्ही बाजुचे पोहच रस्त्यांचे भूसंपादन करून ती जमीन ठेकेदाराला हस्तांतरित करण्याची जबाबदारी पालिकेची होती. एफ केबीन, ठाकुर्ली उड्डाणपुलांची कामे भूसंपादनविहित वेळेत झाल्याने ही कामे लवकर पूर्ण झाली. वडवली-मोहने रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपूल भूसंपादनाच्या कचाटय़ात अडकला. या पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने भूसंपादन करणे आवश्यक होते. तत्कालीन आयुक्त, शहर अभियंत्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया नंतरही झटपट होईल हा विचार करून वडवली उड्डाणपुलाच्या कामाचा ठेका ठेकेदाराला दिला. काम सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या खासगी जमीन मालकांनी पोहोच रस्त्याला जमीन देण्यास पालिकेला विरोध केला. अनेक वर्ष ही प्रकरणे न्यायालयात सुरू होती. अखेर जमीन मालक, पालिका यांच्यात सामंजस्य झाल्यानंतर दोन वर्षांपासून वडवली रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले.

वाहनकोंडीला विराम

नवीन पुलामुळे टिटवाळा, आंबिवली, मोहने परिसरातील वाहनचालकांना कल्याणमध्ये अडथळ्याविना येता येणार आहे. यापूर्वी आंबिवली भागातून कल्याणमध्ये येण्यासाठी वडवली रेल्वे फाटकाचा अडथळा होता. अनेक वेळा वाहने या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास अडकून पडायची. आंबिवली, मोहने, वडवली, टिटवाळा या भागातील नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई परिसरात नोकरी, व्यवसायासाठी जाणारा बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक दुचाकी, चारचाकी वाहनाने जातो. त्यामुळे वडवली रेल्वे फाटकात सकाळ, संध्याकाळ वाहनांची गर्दी वाढली होती. याच मार्गातून अवजड मालवाहू वाहने जात असल्याने कधी नव्हे एवढी कोंडी या भागात गेल्या दोन वर्षांपासून पाहण्यास मिळत होती. वडवली रेल्वे फाटकावर उड्डाणपूल झाल्याने विनाविलंब इच्छितस्थळी पोहोचणे शक्य होणार आहे.

वडवली रेल्वे फाटकाजवळील नवीन उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला आहे. राहिलेली काही किरकोळ, तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहेत. पुलाच्या दोन्ही बाजुला पुलावर दिशादर्शक फलक बसवायचे आहेत. रेल्वे मार्गावरील पुलाच्या भागात संरक्षित जाळ्या बसवायच्या आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतील.

– सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता