महात्मा गांधी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची निविदा
पावसाळ्यामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडीची भीती
मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत नौपाडा येथील महात्मा गांधी मार्गावरील सरस्वती शाळेलगत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ठाणे शहराच्या वाहतुकीची धमणी मानला जाणाऱ्या गोखले तसेच आसपासच्या मार्गावर वाहतुकीची अभूतपूर्व अशी कोंडी होत असतानाच ठाणे महापालिकेने याच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा हट्ट कायम ठेवत सुमारे अडीच कोटी रुपयांची निविदा काढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाचा अक्षरश: सपाटा लावला आहे. ही कामे करीत असताना अभियांत्रिकी विभागाने ठोस नियोजन करण्याची आवश्यकता यापूर्वीही व्यक्त झाली आहे. असे असताना उड्डाणपुलाचे काम सुरू असताना त्याच रस्त्यावर काँक्रीटचा मुलामा देण्याची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेच्या या हट्टामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होईल, अशी भीती व्यक्त होत असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या निविदा प्रक्रियेस हिरवा कंदील दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात नमूद केल्यानुसार रस्त्यांची रुंदी असावी, असा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा आग्रह आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे करीत असताना ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मूळ शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची योजना महापालिकेने आखली आहे. त्यानुसार गोखले मार्ग, राम मारुती रोड, जुना स्टेशन रोड, तीन हात नाका ते माजिवडा चौक अशा काही महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामांसाठी तब्बल २७ कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे. रेल्वे स्थानकाला जाताना प्रवाशांना रुंद रस्ते मिळावेत आणि कोंडीविरहित प्रवास करीत यावा, असा उद्देश यामागे आहे.

निविदा प्रक्रियेचा तुघलकी डाव
एकीकडे मूळ शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रकल्प आखला जात असताना अभियांत्रिकी विभागाने हरि निवास सर्कल ते कोपरी उड्डाणपूल या महात्मा गांधी मार्गाच्या रुंदीकरणाचाही निर्णय घेतला असून या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याची उभारणी करण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शहरातील तीन भागांत उड्डाणपूल उभारण्याची कामे सुरू केली आहेत. या कामासाठी नौपाडा पोलीस ठाणे, सरस्वती शाळा, शाहू मार्केट अशी गर्दीची ठिकाणे असलेल्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्यावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याविषयी नियोजनकर्त्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या कामामुळे या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना महापालिकेने याच मार्गावर रस्त्याचे काम करण्यासाठी निविदा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या धबगडय़ात रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जाईल का, असा सवाल उपस्थित होत असून एकाच वेळी दोन्ही कामे सुरू झाल्यास प्रवाशांनी नेमके जायचे कोठून, असा सवालही उपस्थित होत आहे.

आयुक्तांच्या आदेशावरून..
यासंबंधी महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी रस्त्यांचे काम करताना उड्डाणपुलाच्या कामाचा भाग वगळण्यात आला आहे, असा दावा केला. रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावणार नाही तसेच या भागात वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानेच ही कामे केली जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.