बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शुक्रवारी पहाटे वेगळ्याच वातावरणाचा अनुभव आला. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि लगतच्या ग्रामीण भागांवर दाट धुक्याची पांढरीशुभ्र चादर पसरली होती. शहरातील रस्ते आणि मोकळी मैदाने धुक्यात हरवून गेली होती. एकीकडे या धुक्यामुळे निसर्गाचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले, तर दुसरीकडे हे धुके आहे की रासायनिक प्रदूषण, या विवंचनेत नागरिक पडले आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या आगमनाला, म्हणजेच रविवार आणि सोमवारी पावसाचे पुन्हा आगमन होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सुरुवातीच्या समाधानकारक पावसानंतर आता पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे भातपीक धोक्यात आले आहे. निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भातपिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच पावसाचा खंड पडल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या वातावरणामुळे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील भातशेतीवर आणि पिकांच्या पानांवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू जमा झाले होते. धुक्यात हरवलेली हिरवीगार शेती आणि पानांवर चमकणारे दवबिंदू यामुळे निसर्गाचे एक अत्यंत मनमोहक आणि नयनरम्य दृश्य निर्माण झाले होते.
निसर्गाचे हे रूप एकीकडे सुखावणारे असले, तरी पहाटे फेरफटका मारण्यासाठी जाणारे नागरिक, खेळाडू आणि ज्येष्ठ मंडळी मात्र काहीशी धास्तावली आहेत. गुरुवारी मध्यरात्री बदलापूर शहर आणि परिसरात तीव्र रासायनिक दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटे पसरलेले हे आवरण निव्वळ नैसर्गिक धुके आहे की प्रदूषणाचा विळखा, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शहरात आधीच डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना, या धुरक्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकण विभागातील हवामानावर अभ्यास करणारे हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक यांनी या वातावरणीय बदलामागील शास्त्रीय कारण स्पष्ट करत नागरिकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांच्या दरम्यान मान्सूनच्या ऋतू संक्रमणाच्या काळात अशी स्थिती अगदी सामान्य असते. सध्या हंगामातील पश्चिमेकडील वारे कमजोर झाले असून, रात्रीचे वातावरण शांत आणि निरभ्र असते. पावसाळ्यामुळे जमिनीत मुबलक ओलावा शिल्लक असतो. रात्रीच्या वेळी जमिनीचे विकिरणजन्य थंडकरण झाल्याने जमिनीलगतची हवा दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते आणि परिणामी दाट धुक्याची निर्मिती होते. तसेच, नव्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे, रविवारी आणि सोमवारी बाप्पाच्या आगमनाच्या वेळी पुन्हा दमदार पाऊस पडेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
