किशोर कोकणे
ठाणे : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू असली तरी ठाणे शहरात अजूनही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता नवी शक्कल लढविली आहे. ठाणे पोलीस शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात स्वयंसेवकांच्या मदतीने हेल्मेट न घालणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल परिसरात वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती करण्यासाठी उभे करणार आहेत. अशा चालकांकडून दंड वसूल केला जाणार नाही मात्र त्यांचा बराचसा वेळ यासाठी खर्ची पडू शकतो.
केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. या नव्या कायद्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ झाली आहे. ई-चलान कार्यपद्धतीमुळे कारवाई होत असली तरीही वाहनचालकांना केव्हाही दंडाची रक्कम भरण्याची तरतूद असल्याने नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. दर महिन्याला ठाणे शहरात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण हे हजारांच्या घरात असते.
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्यांचा आणि सिग्नल मोडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांविरोधात कारवाईसाठी नवी शक्कल लढविली आहे. ठाणे शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांचे कर्मचारी आणि काही स्वयंसेवक सिग्नल परिसरात उभे राहणार आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांकडून अडविले जाणार आहे. त्यानंतर या नियम मोडणाऱ्या चालकांना सिग्नल परिसरात १५ ते २० मिनिटे उभे करून त्यांच्याकडून जनजागृती करून घेतली जाणार आहे. त्यांच्या हातामध्ये फलकही दिले जाणार आहे. त्यांच्याकडून दंडाची रक्कम घेतली जाणार नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना त्यांचा बहुमूल्य वेळ सिग्नल परिसरात व्यतीत करावा लागणार आहे. तर ज्या वाहनचालकांना जनजागृती करायची नसेल त्यांच्याकडून त्याच ठिकाणी दंडाच्या रकमेची वसुली केली जाणार आहे.


दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणारे आवश्यक आहे. अनेक वाहनचालक या नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. अनेकांचे यामुळे मृत्यूही झालेले आहेत. तसेच सिग्नल असतानाही वाहनचालक तो ओलांडताना दिसतात. त्यामुळे अशा वाहनचालकांना त्यांची १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करण्यासाठी द्यावी लागणार आहेत.-बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.