ठाणे – बदलापूर पश्चिम येथील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कुल व्हॅनचालकाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोणत्याही खासगी, अनधिकृत किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे स्पष्ट आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
बदलापूर येथे गुरुवारी एका चार वर्षाच्या चिमुकलीवर शाळेच्या गाडीत चालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी वाहनचालकाविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून वाहन नोंदणी निलंबनासाठी वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आरोपी वाहनचालकाची अनुज्ञप्तीही निलंबित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून, पालकांनी आपल्या पाल्याला केवळ नोंदणीकृत, परवानाधारक व नियमबद्ध स्कुलबस किंवा व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे. अनधिकृत वाहनांचा वापर टाळून पालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांच्याकडून शालेय वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल २५९ वाहनांवर कारवाई करत ७ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर जानेवारी २०२६ या महिन्यातच ३९ वाहनांवर कारवाई करून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
