कल्याण परिसरात राहणाऱ्या तृतीय पंथीयांकडून कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानका जवळील रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात ख्वाहिश फाऊंडेशनच्या सहकार्याने गरीबाची थाळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.तृतीय पंथीयांना स्थानिक पातळीवर रोजगाराचे साधन तयार व्हावे. रोजगार देणारी एक साखळी अशा प्रकारच्या उपक्रमातून सुरू व्हावी या उद्देशातून कल्याण मध्ये हा प्रथमच पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची यशस्वीता पाहून हा उपक्रम इतर शहरांमध्ये सुरू केला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत भुरट्या चोऱ्या वाढल्याने रहिवासी हैराण

वयोवृध्दांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत. त्या योजनांमध्ये तृतीय पंथीयांमधील वृध्दांचा समावेश करण्यात येईल. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. शाळा, शिक्षण अशा प्रवाहातून या वर्गाची वाटचाल सुरू व्हावी, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.तृतीय पंथीयांच्या गरीब थाळी उपक्रमात गरजू, विधवा, परितक्त्या महिला, आदिवासी महिला यांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी प्रत्येकाला आर्थिक उत्पन्नाचे साधन तयार व्हावे. या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबियांना हातभार लागावा, हाही या उपक्रमाचा उद्देश आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : यंदाही पर्यावरणपुरक विसर्जन परंपरा कायम ; कृत्रिम तलावात गणेश मुर्ती विसर्जन संकल्पनेस ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

महाराष्ट्रातील मतदार यादीत सर्वाधिक तृतीय पंथीयांची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ही संख्या ७८४ आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेऊन असे उपक्रम शहराच्या विविध भागात सुरू करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे, असे ते म्हणाले.ख्वाहिश फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीय पंथीय बारावीचा अभ्यास करत आहेत. तीन जण वाणीज्य अभ्यासक्रमाची अंतीम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यांना फाऊंडेशनतर्फे सर्वोतपरी साहाय्य केले जात आहे, असे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. तृतीय पंथीयांना हक्काचा निवारा नाही. या वर्गासाठी मुरबाड तालुक्यात १० एकर जागा राखीव आहे. या जागेवर तृतीय पंथीयांची वस्ती उभी राहण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. याठिकाणी त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी अध्यक्षा तमन्ना मन्सुरी यांनी केली आहे.