ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित केलेली आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला विदेशी १ कोटी ७२ लाख ९४ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यात, १४०० बॉक्स विदेशी मद्य, एक सहाचाकी आयशर ट्रक आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणात एकाला अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त (अं. व. द) प्रसाद सुर्वे राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभागचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानुसार आणि उपअधीक्षक तसेच निरीक्षक, विभागीय भरारी पथक, कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

भरारी पथकाने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, सोनाळे गावच्या हद्दीत, नाशिक–मुंबई महामार्गावर येथे सापळा रचला. दरम्यान, आयशर कंपनीचा ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला. वाहनाच्या मागील भागाची झडती घेतली असता गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की (१८० मिली) चे एकूण १४०० बॉक्स आढळून आले. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.