करोना चाचणीची ऐशीतैशी, रिक्षा चालकांकडूनच बाहेरगावच्या प्रवाशांना उपनगरीय रेल्वे तिकीट

किशोर कोकणे

ठाणे : लांब पल्ल्याच्या प्रवाशांची करोना चाचणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावर करोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे तसेच राज्य आणि देशाबाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या अधिकाधिक संख्येने चाचण्या कराव्यात असे आदेशही आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिले आहेत. तरी ठाणे रेल्वे स्थानकात आरोग्य यंत्रणा व पोलिसांच्या डोळ्यादेखत परगावातून येणाऱ्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून पळवापळवी सुरू आहे. 

 लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून येणाऱ्या प्रवाशांची ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावर करोना चाचणी केली जाते. त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना शहरात दाखल होण्यास परवानगी असते. करोनाबाधित प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते.

गेल्या काही दिवसांपासून येथील पोलिसांचा बंदोबस्त कमी झाल्याने रिक्षाचालक पुन्हा एकदा फलाटावर येऊ लागले आहेत. हे रिक्षाचालक लांब पल्ल्याच्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या दारात अडवून त्यांना उपनगरीय प्रवाशाची तिकीट काढून देत आहेत. या प्रवाशांकडे उपनगरीय प्रवासाचे तिकीट असल्यास त्यांची करोना चाचणी होत नाही. सामानसु्मान अधिक असले तरी हे प्रवासी आम्ही उपनगरातून प्रवास करूनच आलो आहोत असा दावा या तिकिटांच्या आधारे करतात. त्यामुळे महापालिकेच्या करोना चाचणी केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नाइलाज होतो. या तिकिटांच्या मोबदल्यात संबंधित प्रवासी रिक्षाचालकासोबत पुढील प्रवासास मान्यता देतात. यासाठी काही प्रवासी अधिक रक्कम मोजण्यासही तयार होतात.

चाचणी टाळण्यासाठीची बनवाबनवी

लांब पल्ल्यांच्या गाडय़ातील प्रवाशांना हे रिक्षाचालक हेरून त्यांना सॅटिस पुलावर होणाऱ्या चाचणी टाळण्यास भाग पाडतात. उपनगरीय रेल्वे प्रवासास सरसकट परवानगी असल्याने गणवेश नसलेले रिक्षाचालक किंवा त्यांचे साथीदार तिकीट खिडक्यांवर रांगा लावतात. त्यानंतर स्वत:च्या लशीच्या प्रमाणपत्राच्या आधारे कल्याण, मुंब्रापर्यंतचे तिकीट खरेदी करतात. तिकीट काढल्यानंतर हे तिकीट लांब पल्ल्यावरून येणाऱ्या प्रवाशास दिले जाते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या प्रवाशास अडविल्यास हा प्रवासी उपनगरीय प्रवासाचे तिकीट दाखवितो. महापालिका कर्मचारी तेथून गेल्यानंतर रिक्षाचालक या प्रवाशास पुन्हा गाठून त्याला रिक्षाने जादा भाडे आकारून त्याला रिक्षात बसवितो. एखाद्या वेळी या प्रवाशास अडविण्याचा प्रयत्न केल्यास ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे रिक्षाचालक मारहाण किंवा धमकाविण्याचे प्रकारही करत असल्याची माहिती एका महापालिका कर्मचाऱ्याने दिली.  या संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात तपास केला जाईल असे सांगितले.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असतो. परंतु रिक्षाचालक पुन्हा रेल्वेच्या हद्दीत शिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.