scorecardresearch

बदलापूर : सलग दुसऱ्या आठवड्यात वणवा सत्र; समाजकंटांनी वणवा लावल्याचा संशय

काही समाजकंटांमुळे बदलापूर शहराच्या पूर्व भागात असलेले हे जंगल धोक्यात आले आहे.

fire
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

गेल्या आठवड्यात सुरू झालेले वणवा सत्र अजूनही सुरूच असून रविवारी पुन्हा बदलापूरच्या डोंगरावर वणवा लागला. सोमवारीही वणव्याची तीव्रता जाणवत होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग दोन आठवडे सुरू असलेल्या वणवा सत्रामुळे मोठी वनसंपदा जळून नष्ट झाली आहे.

हेही वाचा >>> कल्याण मधील बालिकेची मुरबाड जवळील भैरव गड चढण्याची मोहीम यशस्वी

त्यामुळे पर्यावरप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. बदलापूर शहर आणि अंबरनाथ तालुक्यात मोठी वनसंपदा आहे. अंबरनाथ पूर्वेतून सुरू होणारी डोंगररांग पुढे बदलापूर, वांगणी ते थेट माथेरानपर्यंत पसरली आहे. माथेरान या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामुळे येथे अजूनही चांगले जंगल टिकून आहे. परिणामी या जंगल क्षेत्रात अनेक वन्यजीव आहेत. गेल्या काही वर्षात विविध प्राणी, पक्षी या जंगलात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे जंगल सुस्थितीत राखणे आवश्यक आहे. मात्र काही समाजकंटांमुळे बदलापूर शहराच्या पूर्व भागात असलेले हे जंगल धोक्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून शिरगाव, चिखलोली शेजारील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर वणवा पेटतो आहे. गेल्या आठवड्यात रविवारी शिरगाव भागातील या डोंगराला आग लागली होती.

हेही वाचा >>> पतीचे ५५ तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत घर सोडून गेलेल्या महिलेचा सहा वर्षांनंतर शोध

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात मोठा वेळ गेल्याने आणि दरीच्या भागात वणवा पेटल्याने तो विझवणे शक्य झाले नव्हते. परिणामी मोठी वनसंपदा जळून राख झाली. रविवारी लागलेल्या वणव्याला येथे येणारे पर्यटक किंवा गिर्यारोहक कारणीभूत असावेत अशी शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. रविवार नंतरही याच डोंगराला काही भागात आग लागली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रविवारी पुन्हा या डोंगराला भीषण आग लागली. चिखलोली धरणाच्या बदलापूरच्या बाजूने ही आग लागली होती. या आगीची तीव्रता इतकी होती की लांबून धूर दिसत होता. रात्रीही ही आग सुरूच होती. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पूर्णतः आगीवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला यश आले नाही. सलग दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या वणवा सत्रामुळे मोठी वनसंपदा जळल्याची शक्यता व्यक्त होते आहे. समाजकंटकांनी ही आग लावल्याचा संशय आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 15:22 IST