scorecardresearch

डोंगर उतारावरील घरे रिकामी करण्याची केवळ औपचारिकता; पालिकेची नागरिकांना जाहीर नोटीस

महापालिका क्षेत्रातील डोंगर भागात वसलेल्या घरांवर पावसाळ्यात दरड कोसळून नागरिक मृत तसेच जखमी होण्याचे प्रकार घ़डत असून असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेकडून पावसाळ्यापुर्वी डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यासाठी नोटीसा बजावण्यात येतात.

ठाणे : महापालिका क्षेत्रातील डोंगर भागात वसलेल्या घरांवर पावसाळ्यात दरड कोसळून नागरिक मृत तसेच जखमी होण्याचे प्रकार घ़डत असून असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेकडून पावसाळ्यापुर्वी डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यासाठी नोटीसा बजावण्यात येतात. मात्र, या नोटीसांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. यंदाही पालिकेने अशाचप्रकारच्या नोटीसा नागरिकांना बजावण्यास सुरूवात केली आहे. त्यात झोपडयाचा वापर तात्काळ बंद करुन इतरत्र सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा, अशी सुचना करण्यात येत आहे. तसेच या नोटीसानंतरही घरांमध्ये वास्तव्य सुरुच ठेवले आणि कोणतीही दुर्घटना घडली तर त्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. यामुळे यंदाही पालिकेकडून केवळ नोटीसा बजावण्याची औपचारिकता उरकण्यात येत असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा भागातील डोंगरावर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. पावसाळ्यात डोंगर भागात दरड कोसळून किंवा मातीचा भाग खचून दुर्घटना होण्याची शक्यता असते. शहरात यापुर्वी असे प्रकार घडले आहेत. कळवा येथील डोंगर भागात घोलाईनगर वसलेले आहे. याठिकाणी गेल्यावर्षी दरड कोसळून काही नागरिकांना आपला जीव गमावावा लागला होता. तसेच मुंब्रा भागातील पंजाबी कॉलनी परिसरातही भुसखल्लन झाले होते. परंतु त्यात कोणतीही जीवित तसेच वित्त हानी झाली नव्हती. असे असले तरी अशा घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. डोंगर उतारावरील घरे अतिवृष्टीमुळे वाहुन जाण्याची घटनाही सातत्याने घडत आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात डोंगर उतारावरील माती खचुन मोठे दगड घसरून जीवित आणि वित्त हानी होण्याची भिती व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून डोंगर उतारावरील वस्त्यांमधील घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या जातात. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यास सांगितले जाते. परंतु त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नागरिक तिथेच राहतात. त्यामुळे पालिकेकडून केवळ नोटीसा बजावण्यापुरतीच कारवाई होताना दिसून येते. यंदाही पालिकेने अशाचप्रकारे नोटीसा बजावण्याची औपचारिकता उरकण्यास सुरुवात केली असून मुंब्य्रातील डोंगरावरील झोपड्या रिकाम्या करण्यासंबंधी पालिकेने जाहीर नोटीस काढली आहे.

मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील राणानगर, पंजाबी कॉलनी, गौतम नगर, दत्त चौक, दत्तावाडी परिसर, कैलास गिरी नगर व बाह्यवळण मार्ग परिसर, शैलेश नगर, बंजारा वस्ती सेवालाल नगर, ठाकुरपाडा, सम्राट नगर, गांवदेवी मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ चाळ, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, आझाद नगर, शिवाजी नगर, भय्या वाडी, खडीमशीन रस्ता, गरीब नवाज शाळा या सर्वच डोंगर उतारावरील आणि खाडी किनारी भागातील वस्ती आहेत. याठिकाणी पावसाळयात मोठी पर्जन्यवृष्टी होऊन दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याठिकाणी राहत असलेल्या झोपडयाचा वापर तात्काळ बंद करुन इतरत्र सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा, असे पालिकेने नोटीसमध्ये म्हटले आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्या्च्या डोंगरावरुन पावसाळ्यात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह निर्माण होऊन ठिकठिकाणी धबधबे तयार होतात. याठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी जाऊ नये असा सुचनाही पालिकेने केली आहे. शहरातील कळवा आणि वागळे इस्टेट भागातही अनेक ठिकाणी डोंगरावर झोपड्या असून याठिकाणीही दरवर्षी घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात येते.

घरांचा वापर बंद करण्यासंबंधी प्रत्येक झोपडीधारकाला प्रत्यक्ष नोटीस बजाविणे वेळे आभावी शक्य नसल्याने त्यांच्यासाठी एकच जाहीर नोटीस काढण्यात आली आहे. ही घरे बेकायदा असल्यामुळे त्यांचे पुर्नवसन पालिका करू शकत नाही. त्यामुळे त्यांनाच त्यांच्या पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे.– सागर साळुंखे सहायक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती. ठा. म.पा

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Formality evacuating houses hillside public notice citizens municipality thane municipal corporation amy

ताज्या बातम्या