scorecardresearch

ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या चर्चेला जोर, माजी नगरसेवकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची वाढदिवसानिमित्त भेट

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या भेटीची एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करत त्यासोबत ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहाँ भी ले जाए राहे, हम संग है…’ अशा चारोळी लिहिल्या आहेत.

Former corporators NCP thane
(image – Shrikant Shinde Twitter/loksatta graphics)

ठाण्यातील राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह राजन किणे यांनी भेट घेतल्याची बाब समोर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या भेटीची एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करत त्यासोबत ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहाँ भी ले जाए राहे, हम संग है…’ अशा चारोळी लिहिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या चर्चेला जोर आला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडाची तयारी करीत असून त्यांना शिंदे गटाचा पाठींबा असल्याची चर्चा आहे. या भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे हे या बंडाचे शिलेदार मानले जात आहे. पक्षाचे १५ ते १६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून मुंब्य्रात आणि कळव्यातही पक्षाला खिंडार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही वाचा – खा. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवस जल्लोषाचा डोंबिवलीतील प्रवाशांना वाहन कोंडीचा फटका

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक रहणमंत जगदाळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असून त्यांनी पक्षप्रवेशाबाबत योग्यवेळी भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. एकेकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे आगामी निवडणुकीत काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ते ही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक अजित पवार यांनी मुंबईत घेतली होती. मात्र या बैठकीला सुमारे १३ माजी नगरसेवक गैरहजर राहिल्याचे समोर आले होते.

हेही वाचा – “माझ्या मते उत्तम मिसळ…” अभिषेक बच्चनने ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत केला खुलासा

मुल्ला हे दिल्लीत बँकेच्या बैठकीसाठी गेले असल्यामुळे बैठकीला उपस्थित नव्हते आणि त्यांनी तिथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. त्यामुळे मुल्ला यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. असे असतानाच, खासदार श्रीकांत शिंदे यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला असून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह राजन किणे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 14:34 IST