ठाणे : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवरील अत्याचाप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे चांगले अधिकारी आहेत. त्यांनी माझ्यासोबत यापुर्वी काम केले आहे. परंतु चकमक प्रकरणानंतर अधिकाऱ्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागतो. त्यामुळे संजय यांनाही हा ससेमिरा चुकणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी चकमकफेम अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. तसेच पोलिस वाहनामध्ये चकमक होण्याची राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावाही त्यांनी केला.

ठाणे आणि मुंबईतील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी मुंबई आणि ठाणे पोलीस दलात गुन्हे अन्वेषण शाखेत काम केले आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे ते प्रमुख होते. त्यांनी ठाण्यातील मंचेकर टोळी संपविली होती. त्यांनी ठाण्यात २२ तर मुंबईत ३२ अशा एकूण ५४ गुन्हेगारांचा चकमकीमध्ये खात्मा केला आहे. त्यांच्यासोबत अनेक अधिकाऱ्यांनी काम केले आहे. त्यामध्ये ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय शिंदे यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला – खासदार नरेश म्हस्के

बदलापुरातील दोन चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीनंतर संजय शिंदे हे चर्चेत आले आहेत. काहीजण त्यांच्या कारवाईचे समर्थन करत आहेत तर, काहीजण त्यांच्यावर टिका करत आहे. असे असतानाच, त्यांचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले रविंद्र आंग्रे यांनी मात्र संजय शिंदे हे एक चांगले अधिकारी असल्याचे म्हटले आहे. मी ठाणे पोलीस दलात खंडणी विरोधी पथकाचा प्रमुख असताना संजय शिंदे यांनी माझ्यासोबत काम केले. त्यावेळी ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. चार वर्षे त्यांनी माझ्यासोबत काम केले होते. संजय शिंदे हे चांगले पोलीस अधिकारी आहेत. परंतु चकमक प्रकरणानंतर पोलिस अधिकाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागतो याचा अनुभव आम्ही घेतला आहे. ती घटना कशी झाली, त्यावेळी परिस्थिती काय होती, अशी सर्व उत्तरे द्यावी लागतात आणि त्यावेळी हा ससेमिरा नकोसा वाटतो. त्यामुळे या घटनेतही संजय यांनाही चौकशीचा ससेमिरा चुकणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यात पोलीस वाहनातून नेताना आरोपीसोबत कधीही चकमक झालेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये असे प्रकार घडतात. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिसांचा उत्तरप्रदेश पॅटर्न तयार होत आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Badlapur Sexual Assualt : “पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा

एखादा गुन्हेगार, टोळीतील म्होरक्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळायची. त्यानंतर गुन्हेगार कोणत्या भागातून जाणार, याचा अंदाज सापळा रचला जात असे. गुन्हेगार तेथे आल्यानंतर त्याला शरण येण्याचे आवाहन आम्ही करायचो. परंतु त्याने गोळीबार केल्यास आम्ही स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार करून त्याला ठार करत असे. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे सर्वांचे सहकार्य मिळत होते, असेही आंग्रे यांनी सांगितले.

Story img Loader