शिवनेरी, रायगड, प्रतापगड.. महाराष्ट्रात असे अनेक गड-किल्ले आहेत. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतील हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान. महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाला या किल्ल्यांमुळे उजाळा मिळतो. याच किल्ल्यांच्या प्रतिकृती सध्या वसईमध्ये तयार होत आहेत. वसई विजयदिनाचे औचित्य साधून किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली आहे. दुर्गमित्र बुधवारपासून या किल्ले बांधण्याच्या कामाला लागले आहेत.

गेली २ दिवस वसई किल्ल्यात दुर्गमित्रांनी तब्बल १५ अभ्यासपूर्ण व प्रमाणबद्ध गडकोटांच्या उभारणीस सुरुवात करून वसई विजयदिनाच्या गौरवशाली परंपरेस मानवंदना दिली आहे. यात शिवनेरी, रायगड, सिंहगड, अशेरी, टकमकगड, केळवे जंजिरा, शिरगाव जंजिरे, अर्नाळा किल्ला, पन्हाळा, सुवर्णदुर्ग,  विजयदुर्ग, त्र्यंबकगड, मुरूड-जंजिरा, भवानीगड, कोहोजगड, सिंधुदुर्ग, वारूगड या किल्ल्यांचा समावेश आहे. यातील काही गडकोट कायमस्वरूपी बांधकामाइतकेच भक्कम व मेहनतीने उभारण्यात आलेले आहेत. २० ते २३ मे या कालावधीत या किल्ल्यांच्या प्रतिकृती गिरीमित्रांना पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी खुले राहणार आहे.