कल्याण :  विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींन मध्ये एक तरुण आणि  तीन तरुणींचा समावेश आहे.

या टोळीला बोगस कागदपत्रे तयार करून देणाऱ्या इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना जामिनासाठी वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे या आरोपींचा कारागृहातील मुक्काम लांबतो. अशा आरोपींच्या नातेवाईकांना शोधून त्यांना जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांच्याकडून २५ ते ३० हजार रुपये वसूल करणारी टोळी कल्याण न्यायालय परिसरात कार्यरत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा >>> मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने कोट्यावधींची फसवणूक

या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण न्यायालय परिसरात सापळा रचून पोलिसांनी सिद्धार्थ नागवेकर (२९), जस्मित कौर उर्फ डिंपल करतारसिंग गील (२६), ममता अनुपम हजरा (२८), गितिका सागर उदासी (२४) अशा आरोपींना अटक केली. या आरोपींना बोगस कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे. उल्हासनगरमध्ये राहणारा सिद्धार्थ नागवेकर हा इतर तीन आरोपींबरोबर बनावट नाव, पत्ता वापरून शिधापत्रिका, आधारकार्ड, तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टीची पावती तयार करून या बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण न्यायालयात आरोपींना जामीन देत होता. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आरोपींना ३० हजार रुपयांत ही कागदपत्रे उपलब्ध करून दिले जात होत.m. महात्मा फुले चौक पोलिसांनी शोध मोहीम राबवून या चारही आरोपींना कल्याण न्यायालयाच्या आवारातून रंगेहाथ अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली.