ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी चार अभियंत्यांना शुक्रवारी रात्री तात्काळ निलंबित केले आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि ते बुजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, खड्डेभरणीचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून त्यासाठी पालिकेकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीचे उपअभियंता संदीप सावंत आणि कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी शुक्रवारी रात्री काढले.

ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत आहे. त्यात अवजड वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांचा पाहणी दौरा  केला.

खड्डेभरणीच्या कामाची गुणवत्ता तपासली जात नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. तसेच पावसाळ्याआधी खड्डे बुजवूनही पुन्हा खड्डे कसे पडले, याची संपूर्ण चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले होते. या आदेशानंतरच पालिका प्रशासनाने  चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.