ठाणे : भिवंडी येथील कोनगाव भागात वाहन उभे करण्याच्या वादातून चार जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी साहिल शेख याला अटक केली आहे. तर त्याच्या साथिदार अनिकेत पुजारी याचा पोलीस शोध घेत आहेत.
राहुल गुप्ता, शुभम गुप्ता, अनिकेत पाटील आणि ऋषिकेश चव्हाण अशी जखमींची नावे आहेत. कोनगाव भागात राहणाऱ्या राहुल गुप्ता यांच्या वाहन उभे करण्याच्या जागेमध्ये अनिकेत पुजारी याने त्याचे वाहन उभे केले होते. त्यावेळी राहुल याने अनिकेत पुजारी याला त्याचे वाहन बाजूला उभे करण्यास उभे करण्यास सांगितले. परंतु अनिकेत पुजारी याने त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अनिकेत पुजारी याचा मित्र साहिल आणि राहुल याचा भाऊ शुभम देखील त्याठिकाणी आले. त्यानंतर राहुल आणि शुभम या दोघांना त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनिकेत पुजारी याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने राहुल आणि शुभमवर हल्ला केला.
राहुल आणि शुभमच्या मदतीला अनिकेत पाटील आणि ऋषिकेश चव्हाण हे दोघे आले असता, त्यांच्यावरही अनिकेत पुजारी याने वार केले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना देखील दहशत दाखविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने अनिकेत पुजारी आणि साहिल हे दोघे तेथून निघून गेले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी साहिल शेख याला अटक केली आहे.